

प्रेषित गांधी
महाबळेश्वर : देशविदेशातील पर्यटकांच्या पसंतीच्या महाबळेश्वर पर्यटनस्थळी उन्हाळी हंगामामुळे पर्यटकांची चांगलीच गर्दी असून कुटुंब, मित्र परिवारासह काहीसा निवांत वेळ व्यथीत करण्यासाठी आलेल्या पर्यटकांची महाबळेश्वरच्या नावाखाली दांडेघर नाक्यावर अक्षरश: लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. अनेकवेळा प्रदूषण कराच्या नावाखाली या नाक्यावरून महाबळेश्वरकडे येणाऱ्या वाहनांना कर आकारण्यात येत असून या प्रदूषण कराच्या नावाखाली सुरु असलेल्या लुटीमुळे पर्यटक हैराण झाले आहे.
महाबळेश्वरला यायचे असेल तर पाचगणीमध्ये टोल का भरायचा? असा सवाल पर्यटक उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्षे सुरु असलेल्या या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्यास जिल्हा-स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना वेळच नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही वर्षांपासून महाबळेश्वरच्या नावाखाली पर्यटकांकडून पाचगणी येथील दांडेघर टोल नाक्यावर जबरदस्तीने वसुली केली जात असल्याचे पुन्हा एकदा दिसत आहे.
याबाबतच्या अनेक तक्रारी करण्यात येत होत्या, मात्र कोणताही उपाय अजूनही निघाला नाही. आता महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पालिकांवर सत्ता असलेले राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी लक्ष घालून हा विषय सोडवावा, अशी मागणी होत असून या प्रकरणाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी महोदयांनीही स्वतः लक्ष देऊन पर्यटकांची या जाचातून सुटका करावी, असे देखील बोलले जात आहे. पाचगणी टोल नाक्यावर आलेल्या अनुभवाचा एका पर्यटकाने व्हिडिओ चित्रित करून सोशल मीडियावर टाकला असून सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
अनेक पर्यटक हे महाबळेश्वर पर्यटनस्थळी भेट देण्यासाठी आम्ही चाललो आहे, असे पाचगणी येथील नाक्यावर सांगतात मात्र या दांडेघर नाक्यावरील कर्मचारी हे हा प्रवासी व प्रदूषण कर महाबळेश्वर येथेही चालतो असे सांगून मोकळे होतात. त्यानुसार पर्यटक विश्वास ठेवतात व महाबळेश्वरकडे प्रयाण करतात. मात्र,महाबळेश्वरला वेण्णालेक येथे आल्यानंतर महाबळेश्वर पालिका व वनव्यवस्थापन समितीचा टोल भरावा लागतो.
काही वर्षांपूर्वी महाबळेश्वर पालिकेच्यावतीने याबाबत फलक लावून पर्यटकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र एका रात्रीत हा फलक गायब झाला. तो पुन्हा दिसलाच नाही. अशाच स्वरूपाचा मोठा फलक पुन्हा एकदा दांडेघर टोलनाक्यावर लावण्याची मागणी होत आहे.
गत महिन्यात ना. मकरंद पाटील यांच्या आढावा बैठकीत हा विषय महाबळेश्वरमधील काही नगरसेवकांनी ना. पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यानंतर देखील टोल धाडीचा प्रकार सुरूच असल्याचे दिसत आहे. महाबळेश्वर व पाचगणी या दोन्ही पालिकांमध्ये ना. पाटील यांच्या विचारांची सत्ता आहे. दोन्ही लोकनियुक्त नागराध्यक्षांसह डझनभर नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांनी एकत्रित बसून हा विषय गांभीर्याने घेत पर्यटकांची या टोलधाडीमधून सुटका करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी होत आहे.