

सातारा : सातारा परिसरात 62 वर्षांच्या वृद्धाने अल्पवयीन 11 वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. दुसर्या घटनेत एकाने घरात घुसून पतीसमोरच विवाहितेवर ‘हात’ टाकून विनयभंग केला. या दोन्ही घटनांमुळे सातार्यात संतापाची लाट उसळली आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजी यशवंत कदम (वय 62, रा. महागाव, ता. सातारा) याला अटक केली. शिवाजी कदम याने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत पीडित मुलीवर अत्याचार केले आहेत. या घटनेत वृद्धाने मुलीचे फोटो व व्हिडीओ काढण्याचा किळसवाणा प्रकार केला आहे. मुलगी अज्ञान असल्याचा गैरफायदा घेत तिला धमकावल्याने मुलीने घाबरून कुटुंबीयांना सांगितले नाही. मुलगी घाबरून राहत असल्याचे लक्षात आल्यानंतर तिला बोलते केले असता नेमक्या घटनेची माहिती समोर आली. त्यानुसार मुलीच्या कुटुंबीयांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
दुसरा गुन्हा विनयभंगाचा आहे. याप्रकरणी ऋषीकेश प्रताप चव्हाण (वय 29, रा. कोडोली, सातारा) याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिला घरी असताना संशयित तिच्या घरी गेला. महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी महिलेचा पती तेथे आल्यानंतर संशयिताने त्यांनाही मारहाण केली. याचदरम्यान संशयिताने तिचा विनयभंग केला. मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्यानंतर ‘तू माझी झाली नाहीस तर कुणाचीच होवू देणार नाही’, अशी धमकी देवून पसार झाला. या सर्व घटनेने दाम्पत्य घाबरुन गेले. संशयित महिलेची वेळोवेळी छेड काढू लागल्याने अखेर त्याच्या विरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोक्सोच्या घटनेत वृद्धाने अल्पवयीन मुलीला चिठ्ठ्या लिहून प्रेम व्यक्त केल्याचे धक्कादायकरित्या समोर आले आहे. पीडित मुलीने घटनाक्रम सांगितल्यानंतर पोलिसांनी वृद्धाने लिहिलेल्या चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. याशिवाय वृद्धाने मोबाईलमध्ये फोटो व व्हिडीओ तयार केल्याने मोबाईलदेखील जप्त केला आहे. संशयित वृद्ध निवृत्त जवान असल्याचे समोर आले आहे.