ढेबेवाडी/सणबूर : पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील भालेकरवाडी येथे मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने वृद्धा बचावली असली, तरी या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
मालन खाशाबा भालेकर (वय 65, रा. भालेकरवाडी) असे जखमी महिलेचे नाव आहे. मालन भालेकर मंगळवारी सकाळी गावालगतच्या शिवारात गवत कापत होत्या. यावेळी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. लोकांची हालचाल आणि आवाज वाढताच बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. ग्रामस्थांनी जखमी मालन भालेकर यांना तातडीने ढेबेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
आकस्मिक हल्ला, थरारलेले गाव..!
अलीकडच्या काळात पाटण तालुक्यात वन्य प्राणी-मानव संघर्षाच्या घटना वाढत असल्याचे दिसून येत आहे. जंगलालगतच्या वस्त्यांमध्ये शेती काम, चारा कापणी यासाठी जाणाऱ्या लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने गस्त वाढवून बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. तसेच प्रतिबंधक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे.