

सातारा : साेशल मीडियावरील फेसबुक, इन्स्टाग्राम या साेशल मीडियावर सातारचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट पडल्याने संतापाची लाट उसळल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. गुरुवारी मध्यरात्री समर्थक शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी तळ ठोकून बसले. अखेर शुक्रवारी दुपारी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला.
सोशल मीडियावरील फेसबुकवर खा. उदयनराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह कमेंट पडल्याची बाब सातार्यातील काही जणांच्या नजरेस आली. खा. उदयनराजे यांच्यावर आक्षेपार्ह कमेंट पाहून समर्थकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. पाहता पाहता ही बाब सर्वत्र पसरल्यानंतर नगरसेवक पंकज चव्हाण, विजय बडेकर, समीर माने यांच्यासह अनेक समर्थक एकत्र जमले. गुरुवारी रात्री साडेदहा वाजता त्यांनी शहर पोलिस ठाणे गाठले. पोलिस अधिकारी तेथे नसल्याने समर्थकांचा पारा चढला. आम्हाला आताच गुन्हा दाखल करायचा असून संशयितांना तत्काळ अटक करा, अशी मागणी केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सातारा शहर पोलिस ठाण्यातील हा प्रकार वरिष्ठ अधिकार्यांना समजल्यानंतर फोनाफोनी झाली. प्राथमिक तांत्रिक तपास, कायदेशीर बाबी तपासून शुक्रवारी गुन्हा दाखल करण्याचे ठरले. त्यामुळे रात्री १ वाजता संतप्त जमाव तेथून बाहेर पडला. शुक्रवारी सकाळी पुन्हा खा. उदयनराजे समर्थक मोठ्या प्रमाणात शहर पोलिस ठाण्यासमोर जमू लागले.
अखेर पोलिसांनी दुपारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. साेशल मीडियावर खा. उदयनराजे भोसले यांच्या अनुषंगाने सुमारे ८ जणांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या प्रतिक्रिया आक्षेपार्ह आहेत. यामुळे संशयितांवर सार्वजनिक शांतता, सलोखा बिघडवल्याप्रकरणीचे कलम लावण्यात आले आहे. सोशल मीडियावरील संशयितांची नेमकी नावे ही तपासीअंती समोर येतील, अशी माहिती पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी दिली.