

सातारा : सातारा शहर पोलिसांनी ठिकठिकाणच्या तीन कॅफेंवर धाड टाकली. यामध्ये अश्लील चाळे करणार्या 9 जणांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कॅफे चालकांचे धाबे दणाणले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास राधिका रोडवरील असणार्या ब्लॅक इन कॅफे अँड रेस्ट या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला. या कॅफेमध्ये पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेर्याच्या कक्षेपासून दूर होती. कॅफेमध्ये दरवाजे अपारदर्शक ठेवून अंधार होता. येणार्या-जाणार्या व्यक्तींचे नोंदणी रजिस्टर ठेवले नव्हते. तसेच कॅफेमध्ये अश्लील कृती करण्यास प्रेरणा दिली गेली होती. यामुळे कॅफेचालक सुशांत जितीन धुमाळ (रा. करंजे, सातारा) तर अश्लील चाळे करणार्या शंतनू गव्हाणे (रा. गव्हाणवाडी, ता. पाटण) आणि सातारा तालुक्यातील एका गावात राहणार्या युवतीवर कारवाई करण्यात आली आहे.
दुसरी कारवाई सिटी बिझनेस सेंटर येथील आरबी कॅफेवर करण्यात आली. याप्रकरणी कॅफे चालक रोहित गजानन सुतार (रा. किन्हई, ता. कोरेगाव) शेखर संतोष सुतार (रा. तासगाव, ता. सातारा) आणि सातारा तालुक्यातील एका युवतीवर ही कारवाई करण्यात आली आहे. तिसरी कारवाई गोडोली येथील मंदिरासमोरील कॅफे सातारा या कॅफेवर करण्यात आली. येथे पोक्सोप्रकरणी अल्पवयीन मुलावर कारवाई करत कॅफे चालकावरही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कॅफेमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर संशयिताकडून अत्याचार झाले आहेत.