

सातारा : गणेशोत्सव संपल्यानंतर नदी, तलाव, समुद्र आणि अन्य जलस्रोतांमध्ये विसर्जित होणारे निर्माल्य हे जलप्रदूषणाचे एक कारण ठरू नये, यासाठी रेवदंडा, ता. अलिबाग, जि. रायगड येथील डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक उपक्रम राबवत आहे. रायगडपासून कोल्हापूरपर्यंत राबवण्यात येणारा निर्माल्यातून निर्मलतेकडे सह खतनिर्मितीचा पर्यावरणपूरक प्रयोग राज्याला दिशादर्शक ठरला आहे.
प्रतिष्ठानतर्फे अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीसदस्यांकडून मोठ्या प्रमाणावर निर्माल्य संकलित केले जाते. त्यातील प्लास्टिक, दोरा, कागद व अन्य न कुजणारे घटक वेगळे करून फुले, पाने आदी सेंद्रिय घटकांपासून कंपोस्ट खत तयार केले जाते. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या बैठक हॉललगतच्या मोकळ्या जागेत या प्रक्रियेसाठी व्यवस्था केली जात असल्याने धार्मिक उत्सवातून निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे पर्यावरणपूरक पुनर्वापराचे मॉडेल उभे राहिले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून २०१९ पासून निर्माल्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीची प्रक्रिया दरवर्षी राबवली जात आहे. यामुळे पर्यावरण संवर्धनाची एक साखळी तयार झाली आहे.
२०१९ पासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून ३६ लाख ६१ हजार ६११ वृक्षांची लागवड करण्यात आली. या मोहिमेसाठी ३ लाख २१ हजार मनुष्यबळाचा वापर झाला. याच कालावधीत प्रतिष्ठानच्या माध्यमातून १४० स्वच्छता अभियाने राबवण्यात आली. त्यात २० लाख २३ हजार ३६९ श्रीसदस्य सहभागी झाले आणि १ लाख १५ हजार २३ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. याच धर्तीवर निर्माल्य संकलन, खतनिर्मिती, वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, जलस्रोत स्वच्छता, विहीर पुनर्भरण आणि जलसंधारण असे विविध उपक्रम अनेक जिल्ह्यांत राबवले जात आहेत.