

सातारा : जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड व मलकापूर या नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य शासनाने जाहीर केला होता. सर्व नगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेवर 147 हरकती दाखल झाल्या होत्या. यातील 5 हरकती सुनावणीत मान्य केल्याने त्याचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्यात आला. 142 हरकती फेटाळल्या असून, सर्व नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना अंतिम केली आहे. त्यामुळे नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यातील सर्व नऊ नगरपालिकांची मुदत संपली असून तेथे प्रशासक आहे. नगरपालिका निवडणुकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम दोन महिन्यांपूर्वी जाहीर झाला होता. त्यानुसार सर्व मुख्याधिकार्यांनी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर या प्रभाग रचनेवर सूचना व हरकती मागवल्या होत्या. यामध्ये सातारा पालिकेत 13, कराड पालिका 15, फलटण पालिका 97, वाई पालिका 2, पाचगणी व म्हसवड पालिका प्रत्येकी 1, महाबळेश्वर पालिका 3, रहिमतपूर पालिका 9, मलकापूर पालिका 6 अशा सर्व मिळून 147 हरकती दाखल झाल्या होत्या.
या हरकतींवर जिल्हाधिकार्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकार्यांसमोर सुनावणी झाली होती. या सुनावणीत कराड, म्हसवड व महाबळेश्वर प्रत्येकी 1 व वाई 2 अशा 5 हरकती मान्य केल्या होत्या. उर्वरित 142 हरकतींसह प्रस्ताव निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठवण्यात आला. 142 हरकती फेटाळल्या आहेत. त्यामुळे सर्व नगरपालिकांची प्रारूप प्रभाग रचना अंतिम केली आहे.
सोयीच्या आरक्षणासाठी इच्छुकांचे देव पाण्यात
सर्वच नगरपालिकांची सार्वत्रिक निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना अंतिम झाली आहे. त्यामुळे निवडणुकीचा पुढील टप्पा प्रभाग रचनेच्या आरक्षण सोडतीचा असणार आहे. पुढील महिन्यात प्रभाग रचना आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. सोयीचे आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. सातारा पालिका निवडणुकीत नगरसेवकपदासाठी अनेकांनी जोरदार तयारी केली आहे. नगरसेवकपदाच्या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.