Satara Leopard Rescue : न्हाळेवाडी हल्ल्यातील बिबट्या देगावमध्ये जेरबंद

शोधमोहिमेला यश; २७ ट्रॅप कॅमेरे, २१ पिंजरे आणि ४ थर्मल ड्रोनचा वापर
Satara Leopard Rescue : न्हाळेवाडी हल्ल्यातील बिबट्या देगावमध्ये जेरबंद
Published on: 
Updated on: 

सातारा : न्हाळेवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जय संदीप खंडागळे या चिमुकल्‍याचा मृत्यू झाल्यानंतर गेल्या ११ दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेला अखेर यश आले आहे. सातारा तालुक्यातील देगाव येथे १३ ऑक्टोबर रोजी लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद झालेल्या बिबट्याचे वय आणि न्हाळेवाडी येथील घटनेच्या ठिकाणी आढळलेल्या पंजांच्या ठशांवरून त्याच्याशी साधर्म्य दिसून येत असले तरी हल्ल्यातील बिबट्या हाच असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आवश्यक पडताळणीनंतरच याबाबत अंतिम निष्कर्ष काढण्यात येणार आहे.

सातारा तालुक्यातील न्हाळेवाडी येथे दि. ३ ऑक्टोबर रोजी बिबट्याच्या हल्ल्यात जय खंडागळे याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संबंधित बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सातारा वनविभागाने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू केली होती. बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी परिसरात २७ ट्रॅप कॅमेरे, २१ पिंजरे आणि चार थर्मल ड्रोन तैनात करण्यात आले होते. आधुनिक तांत्रिक साधनांच्या मदतीने बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते.

या मोहिमेत सातारा वनविभागासोबत रेस्क्यू पुणे, डब्ल्यूआरके कराड आणि वन्यजीव उपचार केंद्र, वराडे यांच्या पथकांनीही सहभाग घेतला. विविध यंत्रणांच्या समन्वयातून परिसरात नियमित गस्त, निरीक्षण आणि शोधकार्य सुरू होते. अखेर १३ ऑक्टोबर रोजी देगाव येथे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याने वनविभागाच्या प्रयत्नांना यश आले.

अधिवास स्थिर नसण्याची शक्यता

जेरबंद झालेल्या बिबट्याचे वय कमी असल्याने त्याचा अधिवास आणि निश्‍चित क्षेत्र अद्याप स्थिर नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, वनविभागाने परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाणे, त्याला त्रास देणे किंवा त्याला पाहण्यासाठी गर्दी करणे टाळावे. तसेच, बिबट्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने वनविभागाला कळवावे आणि अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news