

वाई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाई तालुक्यातील जोर- जांभळी खोर्यात भूस्खलन होवून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. या पावसाने या भागातील ७ जनावरे दगावली असून तब्बल २५ एकर भातशेती वाहून गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.
मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील माती आणि दगड मोठ्या प्रमाणात कोसळल्याने भातशेतीचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांची संपूर्ण शेती गाळाखाली गेली आहे. जांभळी–पारटवाडी मार्गावरील पुलाचा पुढील भराव वाहून गेल्याने रस्ता खचला असून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच पश्चिम भागातील वासोळे, आकोशी, व्याहळी, बलकवडी, उंब्रज, जोर, धनगरवाडा आणि काटेवस्ती या मार्गांवरील काही पुलांचेही नुकसान झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. २०२२ मधील भूस्खलनाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोकलेन व जेसीबीच्या साहाय्याने ओढ्यात साचलेला गाळ, दगड आणि झाडे हटवून पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यात आला. तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी बांधकाम विभागाचे श्रीकांत धनावडे, रावसाहेब आवळे, रावसाहेब माने व अधिकारी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम सुरू ठेवले असून भराव पूर्णपणे वाहून गेल्याने दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत संबंधित मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली.