Satara News : पाच मुख्यमंत्र्यांनी केले हिंद केसरींनाच 'चितपट'

मानधनवाढीला वर्षानुवर्षे लावली टांग : आश्वासनांची गदा ढगातच
Maharashtra kesari spardha
महाराष्ट्र केसरी स्पर्धाPudhari
Published on
Updated on

विशाल गुजर

सातारा : रांगड्या मातीच्या खेळातील मानाची हिंद केसरीची गदा जिंकून महाराष्ट्रातील दहा मल्लांनी देशाला आपली 'ताकद' दाखवून दिली. त्याचबरोबर पंचवीस पेक्षा अधिक पैलवानांनी 'महाराष्ट्र केसरी'चा किताब पटकावून आपले कौशल्य दाखवले. या सर्वांना उतार वयात सन्मानाने जगता यावे म्हणून राज्य सरकारकडून मानधन मिळते. मात्र, ही रक्कम तुटपुंजी असल्याची कबुली देऊन ते वाढवण्याची घोषणा एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांनी केली. या सर्वांच्या आश्‍वासनांची गदा ढगातच फिरत आहे. या मंत्र्यांनी भल्याभल्या मल्लांनाच अस्मान दाखवल्याने जगण्यासाठी आता अनेकांची 'कुस्ती' सुरू आहे.

भारतीय कुस्तीला जिवंत ठेवतानाच महाराष्ट्रातील मल्लांनी लाल मातीचा डंका जगभर पिटला. त्यामुळे मराठी मल्लांची नावे आजही अभिमानाने घेतली जातात. पण कुस्ती करताना लाखाची बक्षिसे जिंकणारे मल्ल उतार वयात मात्र हालअपेष्टा सहन करत आहेत. त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून सरकार मानधन देते. हा आकडा फारच कमी असल्याची जाणीव पाच मुख्यमंत्र्यांना झाली. हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीगिरांनी त्यांना भेटून त्याची जाणीव करून दिली. त्यामुळे अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या पाचही जणांनी मानधन वाढवण्याची घोषणा केली. पण आजही त्यांच्या आश्‍वासनाची गदा ढगातच फिरत आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात तर काढलेला अध्यादेश पुन्हा रद्द केला गेला.

पुण्यात १४ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मानधन तिप्पट करण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर नंतर तिप्पट नको, चौपट देतो म्हणून सांगितले; पण तिप्पट, चौपट फारच लांब राहिले. जे दरमहा मिळत होते, तेही काही महिने मिळाले नाही. श्रीपती खंचनाळे, गणपतराव आंदळकर, मारुती माने, हजरत पटेल, चंबा मुताळ हे मल्ल मानधन वाढीची वाट बघून जग सोडून गेले. राहिलेले दीनानाथ सिंग, विनोद चौगुले, योगेश दोडके, अभिजित कटके आणि नुकताच झालेला महेंद्र गायकवाड हे पाच हिंदकेसरी, पंचवीसपेक्षा अधिक महाराष्ट्र केसरी आणि अनेक मल्लांच्या विधवा पत्नी आजही त्याच्या मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांना तर औषधोपचाराचा खर्च भागवणे मुश्‍किल झाले आहे. यामुळे जिवंत असलेल्या मल्लांना मरणयातना सहन करायला लागू नयेत म्हणून दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता करण्याची वेळ सरकारवर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news