मारूल हवेली : पाटण तालुक्यात बेसुमार व अनधिकृत माती उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. दि.२ जून रोजी पकडलेल्या दोन डंपरचालकांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम व गौण खनिज नियमांनुसार प्रत्येकी २ लाख १५ हजार ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पहिल्या कारवाईत दि. २ रोजी सकाळी १० वाजता मौजे नेरळे गावच्या हद्दीत डंपर क्रमांक एमएच-०८-एपी-१७६५ मधून तीन ब्रास मातीची अनधिकृत वाहतूक करताना नेरळे ग्राम महसूल अधिकारी यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी येरफळे येथील ज्ञानदेव तुकाराम गावडे यांना तहसीलदार अनंत गुरव यांनी दि. ४ जून रोजी नोटीस बजावली. त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत सकाळी १० वाजताच मौजे मल्हारपेठ हद्दीत डंपर क्रमांक एमएच-११-एएल-२४८८ मधून तीन ब्रास मातीची अनधिकृत वाहतूक करताना मल्हारपेठ ग्राम महसूल अधिकारी यांनी पकडले. याप्रकरणी येराड येथील धनराज आनंदराव साळुंखे यांना देखील दि. ४ जून रोजी नोटीस बजावण्यात आली.
दोन्ही प्रकरणांत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व गौण खनिज उत्खनन नियम २०१७ नुसार कारवाई करण्यात आली. गौण खनिजाचे बाजारमूल्य प्रति ब्रास ९०० रुपये, रॉयल्टी प्रति ब्रास ६०० रुपये, बाजारमूल्याच्या पाच पट दंडाची रक्कम तसेच वाहनांवरील २ लाख रुपये शास्ती मिळून प्रत्येकी २ लाख १५ हजार ३०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत लेखी खुलासा सादर न केल्यास ही दंडाची रक्कम मान्य आहे असे गृहीत धरून पुढील कारवाई केली जाईल, असे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पाटण तालुक्यात शासकीय कामे व खासगी बांधकामांसाठी मोठ्या प्रमाणात माती उत्खनन होत असून, त्यात अनेक ठिकाणी अनियमितता असल्याच्या तक्रारी होत्या. महसूल प्रशासनाने थेट डंपरवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड ठोठावल्याने अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे इतरांनाही चाप बसेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.