दहिवडी : माण तालुक्यातील कुळकजाई-शेडगेवाडी रस्त्यावर एका व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह झुडपात आढळून आला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, कुळकजाई गावापासून शेडगेवाडी रस्त्याकडे जाणाऱ्या महारकी शिवारात बुधवारी दुपारी काही गावकऱ्यांना झुडपात एक मृतदेह आढळून आला. मृतदेह विवस्त्र अवस्थेत असून तोंड जमिनीच्या दिशेने असल्याने ओळख पटवणे सुरुवातीला कठीण झाले. घटनेची माहिती समजताच बघ्यांची मोठी गर्दी झाली. काही वेळानंतर पोलिसांनी मृताची ओळख पटवली असता, तो रमेश इंगळे (वय 53) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. प्राथमिक तपासात रमेश इंगळे हे काही कामानिमित्त कुळकजाई गावात आले होते.
रात्री उशिरा काम आटोपून ते घराच्या दिशेने निघाले होते. मात्र ते घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. अखेर बुधवारी दुपारी शेडगेवाडी रस्त्यालगतच्या झुडपात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्याचे सपोनि दत्तात्रय दराडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे. या घटने मागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस सर्व तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.