

सातारा : सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत दिवसेंदिवस रंग भरू लागला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे हे ॲक्शन मोडवर आले असून, अनेक नाराज त्यांना फोन करत आहेत. गुरुवारी पाच इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्याचबरोबर पक्षातर्फे सातारा, महाबळेश्वर, म्हसवड, पाचगणी, फलटण, वाई नगरपालिका आणि मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीही मुलाखती झाल्या. तब्बल 65 उमेदवारांनी नगरसेवकपदासाठी मुलाखती दिल्या. दरम्यान, वाई नगराध्यक्षपदासाठी दोघांनी मुलाखती दिल्या.
येथील राष्ट्रवादी भवनात प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी या मुलाखती घेतल्या. याप्रसंगी दीपक पवार, अभयसिंह जगताप, पार्थ पोळके, नरेश देसाई, राजकुमार पाटील, दिलीप बाबर, डॉ. नितीन सावंत, गोरखनाथ नलावडे, पारिजात दळवी, शफीक शेख यांची उपस्थिती होती.
राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे सातारा आणि वाई नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामध्ये सातारा नगराध्यक्षपदासाठी डॉ. संदीप काटे, ॲड. बाळासाहेब बाबर, शरद काटकर, सुजित आंबेकर, नाना इंदलकर यांनी मुलाखती दिल्या. तर वाई नगराध्यक्षपदासाठी तेजपाल वाघ, कैलास जमदाडे यांनी मुलाखत दिली. यासोबत सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, फलटण, म्हसवड पालिका व मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
दरम्यान, सातारा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी 14 जणांनी उमेदवारी मागितली होती. गुरुवारी तब्बल 26 मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. यामध्ये सागर भिसे, महेश गोंदकर, पूजा बनसोडे, रितेश लाड, गणेश वाघमोर, सचिन बागल, ऋषिकेश गायकवाड, आयेशा शेख, विजय बोबडे, उषा जाधव, चेतन चोरगे आदी प्रमुख उमेदवारांनी मुलाखत दिली.