

सातारा : नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात शाळांचे वर्ग सोमवारपासून भरल्यामुळे जिल्ह्यातील ज्ञानमंदिरे विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजून गेली होती. कुठे वाद्याचा गजर, औक्षण, फुलांचा वर्षाव तर कुठे टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे जल्लोषी स्वागताने शाळा प्रवेशोत्सत करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सुमारे दीड महिन्याची दीर्घ सुट्टी संपून सोमवारी जिल्ह्यासह राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शिक्षकांकडून मुलांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्रवेशोत्सवामध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करुन टाळ्यांच्या कडकडाटात मुलांचे प्रवेशद्वारातच स्वागत केले. काही ठिकाणी नवीन प्रवेषितांना प्रवेशद्वारातून वाजत-गाजत वर्गात नेले. शाळा प्रवेशव्दारांवर आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्टुन प्रतिकृती व फुग्यांच्या सजावटीसह तयार केलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. विद्यार्थ्यांना आकर्षक बॅजेसही देण्यात आले. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी धान्यामध्ये बोटाने श्रीगणेश ही अक्षरे गिरवली.
सातारा जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले. जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकारी तसेच महसूलचे अधिकारी व लोक प्रतिनिधींनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी दिल्या. सातारा शहर व परिसरातील शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी पाल्याला शाळेत सोडायला येणार्या पालकांची गर्दी झाली होती. शाळा परिसरात वाहन पार्किंगसाठी गैरसोयीला सामोरे जावे लागले. मुख्य रस्त्यालगतच्या काही शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थी वाहतूक करणार्या वाहनांमुळे शाळा भरण्याच्या वेळेत वाहतूक कोंडी झाली होती.