

सातारा : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा सातारा विभाग आळंदी येथील कार्तिक एकादशी सोहळ्यासाठी सज्ज झाला आहे. सातारा विभागातून देहू व आळंदी येथे जाणाऱ्या वारकरी भाविकांसाठी सुमारे 35 हून अधिक जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. या जादा बसेसचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.
आळंदी यात्रेचा दि. 18 नोव्हेंबरपर्यंत सोहळा आहे. शनिवार दि. 15 नोव्हेंबर रोजी एकादशी आहे. तर सोमवार दि. 17 नोव्हेंबर रोजी संजीवन समाधी सोहळा आहे. एकादशी व संजीवन समाधी सोहळ्यासाठी सातारा जिल्ह्यातून वारकरी व भाविक मोठ्या संख्येने आळंदी व देहू येथे जात असतात. त्यामुळे या यात्रा कालावधीत भाविक, वारकऱ्यांची गैरसोय होवू नये यासाठी महामंडळाच्या सातारा विभागामार्फत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा 3, कराड 3, फलटण 5, वाई 4, पाटण 3, कोरेगाव 3, दहिवडी 3, महाबळेश्वर 2, मेढा 4, पारगाव-खंडाळा 2, वडूज 3 अशा मिळून सातारा विभागातून 35 जादा बसेसचे नियोजन आळंदी येथील यात्रेसाठी करण्यात आले आहे.
आळंदी येथे यात्राप्रमुख म्हणून सहाय्यक वाहतूक अधिक्षक निलेश माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला वाहतूक निरीक्षक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रकांची नियुक्ती केली आहे. सातारा जिल्ह्यातील वारकरी, भाविक व नागरिकांनी जादा एसटी बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांनी केले आहे.