Satara News : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी

५ ऑगस्‍टपर्यंत संस्‍थांचे ठराव : महायुतीसह महाविकास आघाडी सरसावली
satara jilha bank
सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँक
Published on
Updated on

सातारा : सातारा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे धूमशान सुरू झाले आहे. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहायक निबंधक डॉ. महेश कदम यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, ५ ऑगस्टपर्यंत सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर मतदारसंघनिहाय चित्र स्पष्ट होण्यास सुरुवात होणार असून, राजकीय आघाड्यांचे अंतिम समीकरणही समोर येण्याची शक्यता आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असून, ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी तालुकानिहाय बैठका, सभासद संस्थांशी संपर्क, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक पातळीवरील समन्वय वाढवला आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांनीही आपले पारंपरिक बालेकिल्ले कायम राखण्यासाठी एकसंघ रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वीच इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले असून, विविध गटांकडून मतदार संस्थांशी संपर्क वाढवला जात आहे. अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर बैठका आणि राजकीय चर्चांना वेग आला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील वर्चस्व हे केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नसून जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व, ग्रामीण भागातील प्रभाव आणि भविष्यातील निवडणुकांतील ताकदीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच प्रमुख पक्ष प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहत आहेत.

ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची नावे, आघाड्यांचे अंतिम स्वरूप आणि स्थानिक राजकीय समीकरणे स्पष्ट होणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत जिल्ह्याच्या राजकारणातील घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता असून, सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत रंगण्याचे संकेत राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news