

सातारा : प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत महामार्गावर 408 हून अधिक खासगी कंत्राटी प्रवासी बस व ट्रॅव्हल्सची तपासणी केली. यामध्ये सुमारे 136 ट्रॅव्हल्स दोषी आढळून आल्या असून त्यांच्याकडून सुमारे 23 लाख 46 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या दोन महिन्यातील ही कारवाई आहे.
परिवहन विभागामार्फत खासगी, कंत्राटी प्रवासी बस व ट्रॅव्हल्सची तपासणी करण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाला देण्यात आले होते. राज्य परिवहन महामंडळाचे टप्पानिहाय भाडे विचारात घेवून खासगी कंत्राटी प्रवासी बस व ट्रॅव्हल्स वाहनांचे कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. कमाल दरापेक्षा जास्त भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यासाठी वायुवेग पथकांची स्थापना केली होती. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कराड व फलटण यांच्या वायुवेग पथकामार्फत खासगी कंत्राटी प्रवासी बस व ट्रॅव्हल्सची तपासणीची मोहीम सातारा जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गावर हाती घेण्यात आली होती.
आतापर्यंत सातारा, कराड व फलटणच्या वायुवेग पथकांनी सुमारे 408 हून अधिक खासगी कंत्राटी प्रवासी बस व ट्रॅव्हल्सची तपासणी केली. तपासणीमध्ये सुमारे 136 वाहने दोषी आढळून आली त्यांच्याकडून 23 लाख 46 हजार रुपयांचा कर व दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी दिली.