

अशोक मोहने
कराड : कराड उत्तर व दक्षिण या दोन विधानसभा मतदार संघांचा समावेश असणाऱ्या आणि 24 सदस्य संख्या असणाऱ्या कराड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने मोठी चुरस पहायला मिळणार आहे. तालुका ताब्यात ठेवण्यासाठी दोन्ही मतदार संघातील आजी -माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सभापती पदासाठी तगडा व तोडीस तोड उमेदवार देण्याचे कसब नेत्यांना पार पाडावे लागणार आहे.
कालवडे, वाघेरी, येळगाव, वडोली भिकेश्वर, सुपने, शेरे,विंग हे गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गणांत मोठी चुरस पहायला मिळणार आहे. कराड पंचायत समितीचे सभापतीपद बहुतेक वेळा उंडाळकर गटाकडे राहिले आहे. मागील दोन टर्म ते माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे होते. उंडाळकर गट आणि बाळासाहेब पाटील यांनी एकत्रित येत सत्ता राखली होती.
आता परिस्थिती बदलली आहे. कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉ.अतुलबाबा भोसले यांची दक्षिणेत ताकद वाढली आहे. त्यामुळे कराड पंचायत समितीची सत्ता ताब्यात घेण्यासाठी ते कसोसीने प्रयत्न करतील यात शंका नाही. उदयसिंह पाटील- उंडाळकर हेही पंचायत समितीवरील सत्ता अबाधित ठेवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावतील.माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष आघाडीच्या माध्यमातून कितपत या शक्तींचा सामना करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कालवडे गणात कालवडेसह विठोबाचीवाडी, तुळसण, पाचुपतेवाडी, कासारशिरंबे, बेलवडे बुद्रु्रक, ओंड या गावांचा समावेश आहे. यामध्ये कालवडे, बेलवडे बुद्रुक, ओंड, कासारशिरंबे ही गावे सदस्य पदासाठी उमेदवारीचा दावा करतील असे दिसते.
वाघेरी गणात करवडी, वडोली निळेश्वर, शामगाव, अंतवडी, पाचुंद, मेरवेवाडी, वाघेरी, सुर्ली, कामथी, रिसवड या गावांचा समावेश आहे. करवडी, वडोली निळेश्वर, शामगाव या गावातील उमेदवार देण्याबाबत नेते विचार करतील. येळगाव गणात येळगावसह भरेवाडी, गोटेवाडी, भुरभूशी, गणेशवाडी, घराळवाडी, हणमंतवाडी, येवती, शेवाळवाडी येवती, चोरमारवाडी, माटेकरवाडी, लोहारवाडी, शेळकेवाडी म्हासोली, शेवाळवाडी म्हासोली व म्हासोली या गावांचा समावेश आहे. येथे सदस्य पदासाठी अनेकजण इच्छुक आहेत.उंडाळकर गट व भोसले गटाचे या गणात प्राबल्य असल्याने येथे दुरंगी सामना पहायला मिळणार आहे.
वडोली भिकेश्वर गण उत्तर मतदार संघात येतो. हेळगाव,काळगाव, खराडे, कवठे, नवीन कवठे, चिंचणी, बेलवाडी, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, वडोली भिकेश्वर, धनकवडी, कोणेगाव आदी गावांचा समावेश आहे. या गणात बाळासाहेब पाटील गटाचे प्राबल्य आहे. मात्र विधानसभेला मनोज घोरपडे यांनी उत्तरमधून बाजी मारल्याने या गटाचा जनसंपर्कही वाढला आहे. त्यामुळे बाळासाहेब पाटील गट विरूध्द आ.मनोज घोरपडे गट असाच राजकीय सामना प्रामुख्याने दिसेल. सुपने गणात सुपने,पाडळी केसे,पश्चिम सुपने,अबईचीवाडी,वसंतगड, केसे,किरपे विजयनगर या गावांचा समावेश होतो. या गणात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. अनेकांनी तयारी सुरू केली आहे.
शेरे गण हा भोसले यांचे प्राबल्य असणारा गण मानला जातो. या गणात यावेळी कशी लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येकजण वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहे. या गणात शेरेसह थोरातमळा, शेणोली, शेणोली स्टेशन, गोंदी, जुळेवाडी, या गावांचा समावेश होतो. या गणात इच्छुकांची भाऊगर्दी पहायला मिळणार आहे. विंग गणात विंग, शिंदेवाडी, पोतले, घारेवाडी, नवीन घारेवाडी, येरवळे, येणके या गावांचा समावेश आहे.