

शिरवळ : खंडाळा तालुक्यातील शिरवळ औद्योगिक क्षेत्रात खंडणी मागण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यावर दै. ’पुढारी’ने ‘अस्वस्थ एमआयडीसी’ या मथळ्याखाली वृत्तमालिका प्रसिध्द केल्यानंतर पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच गुन्हेगारी रोखणे व शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रादेशिक अधिकार्यांनीही पुढाकार घेतला आहे. खंडणी मागणे, बदनामी करणे, ठेका घेण्यासाठी जबरदस्ती करणार्यांविरोधा तक्रारी करण्याचे आवाहन पोनि यशवंत नलावडे यांनी केले आहे.
शिरवळ, केसुर्डी व धनगरवाडी औद्योगिक वसाहतीमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना वाढू लागल्याने दै.‘पुढारी’ने याची ‘अस्वस्थ एमआयडीसी’ या वृत्तमालिकेतून पोलखोल केली आहे. यावर अखेर पोलिस यंत्रणा व एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकार्यांनी लक्ष घालण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी गुन्हेगारीवर ठोस पावले उचलल्यानंतर रोजगारासाठीही प्रादेशिक अधिकार्यांनी तोडगा काढणे गरजेचे आहे. येथील औद्योगिक क्षेत्रात बेरोजगारीची समस्या,परप्रांतीयांना रोजगार,स्थानिक नेत्यांची कंपनीमध्ये राजकीय ढवळाढवळ यावर उपाययोजना व्हाव्या, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.