

सातारा : जिल्ह्यातील सातारा, फलटण, कराड, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, म्हसवड आणि मलकापूर या नऊ नगरपालिका तसेच मेढा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे धूमशान सोमवारपासून सुरू होत आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. महायुती विरुद्ध मविआ असे चित्र बहुतांश नगरपालिका निवडणुकीत दिसत असले, तरी दोन्हीकडून कमालीचा सस्पेन्स ठेवला आहे. काही ठिकाणी आघाड्यांच्या खेळ्याही खेळल्या जाणार असून, याबाबत घडामोडींची उत्सुकता ताणली आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांमध्ये नगरसेवकपदाच्या 233 जागा आहेत.
त्यामध्ये अनुसूचित जाती 31, अनुसूचित जमाती 3, नागरिकांचा मागस प्रवर्ग 60 तर सर्वधारण प्रवर्गासाठी 139 जागा आहेत. या नऊ नगरपालिकांमध्ये 115 प्रभाग आहेत. नगरपालिकांसाठी द्विसदस्यीय प्रभाग रचना असून सातारा 25 प्रभाग 50 जागा, फलटण 13 प्रभाग 27 जागा, कराड 15 प्रभाग 31 जागा, वाई 11 प्रभाग 23 जागा, महाबळेश्वर, पागचणी, म्हसवड, रहिमतपूर प्रत्येकी 10 प्रभाग 20 जागा तर मलकापूर 11 प्रभाग 22 जागा आहेत. मेढा नगरपंचायतीमध्ये एक सदस्यीय प्रभाग रचना असल्यामुळे 17 वॉर्डमध्ये नगरसेवकांच्या 17 जागा आहेत. प्रत्येक नगरपालिका क्षेत्रात शेकडो इच्छुक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार नाराजीचा फटका बसू नये यासाठी प्रत्येक पक्ष सावध पावले टाकत आहे.
उमेदवारी अर्ज दि. 10 नोव्हेंबरपासून दि. 17 पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. उमेवारांची गैरसोय टाळण्यासाठी व त्यांना वेळेत कागदपत्र मिळण्यासाठी नगरपालिकांनी एक खिडकी योजना सुरू केली आहे. तक्रार निवारण कक्षही सुरू करण्यात आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून सुरूवात होत असल्यामुळे संबंधित नगरपालिकांमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. नगरपालिका कार्यालयांना यात्रेचे स्वरूप आले आहे. मुदत संपल्यानंतर ओस पडलेली ही कार्यालये गर्दीने पुन्हा फुलून गेली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने वेगळेच चित्र नगरपालिका कार्यालयांमध्ये पहायला मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे, अनामत रक्कम जमा करणे गरजेचे आहे.