

सातारा : सातारा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल होण्यास दोन दिवस उलटले तरी एकही अर्ज दाखल झालेला नाही. राजकीय वातावरण तापले असले तरी पक्षांकडून अधिकृत उमेदवारांची घोषणा न झाल्याने निवडणुकीच्या रणांगणात अद्याप शांतता आहे. मात्र, दोन दिवसांत उमेदवारी अर्ज मोठ्या प्रमाणात दाखल होतील, अशी शक्यता आहे.
महायुतीतील भाजप, शिवेसना (शिंदे गट) आणि मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शिवसेना (ठाकरे गट) या सर्वच पक्षांमध्ये उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असली तरी आतल्या गोटात तणाव आणि असंमजस्यतेचे वातावरण कायम आहे. भाजपमध्ये खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या गटातील जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजून निश्चित झालेला नाही. त्यामुळे पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास विलंब होत आहे. साताऱ्यातील सर्व प्रमुख पक्षांत उमेदवारीवरून असलेले अंतर्गत मतभेद हेच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यामागचे विलंबाचे मुख्य कारण आहे. पुढील 48 तासांतच निवडणुकीच्या खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे.
महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांमध्ये प्रभागनिहाय जागा वाटप आणि आरक्षणाच्या घोळामुळे अद्याप उमेदवार अंतिम झालेले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही पुढील काही दिवसांतच उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी शक्यता आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबर आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची गती वाढेल, अशी शक्यता आहे. साताऱ्यातील निवडणूक रंगणार हे निश्चित आहे. मात्र पहिल्या दोन दिवसांत शांतता असली तरी आगामी दोन दिवसांपासून रणधुमाळी वाढणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.