

आदेश खताळ
सातारा : सातारा जिल्ह्यातून दररोज लाखो लिटर दूध गोळा करणार्या दूध डेअर्यांवर दूधामध्ये प्रचंड भेसळ सुरू आहे. ग्राहकांपर्यंत दूध पोहोचण्यापूर्वी अनेक टप्प्यात दुधामध्ये विविध रसायने मिसळली जात आहेत. जिल्ह्यात दूध डेअर्यांच्या माध्यमातून दररोज हजारो लिटर भेसळीचे दूध बाजारात येत असल्याची माहिती आहे. दूधासाठी उभारण्यात आलेले कूलर पॉईंट तसेच दूध डेअर्या भेसळीचा अड्डा बनल्या असून अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडसत्र सुरू करावे, अशी मागणी जिल्हावासियांतून होत आहे.
शेतकरी आपल्या जनावरांचे दूध घेऊन दूध संकलन केंद्रावर म्हणजे दूध डेअरीवर येतो. कॅनमध्ये दूध घेताना फट व सीएनएफ (सॉलिड नॉट फॅट) मोजूर दर ठरवला जातो. मात्र काही दूध डेअर्यांवर दूध गोळा करतानाच प्रचंड भेसळ केली जाते. दुधामध्ये पाणी मिसळून त्याचे प्रमाण वाढवले जाते. मात्र त्यामुळे दुधाची गुणवत्ता ढासळते. पाण्यामुळे दुधाची घनता कमी होते आणि खर्या दुधासारखा फेस येत नाही. त्यामुळे ही भेसळ ओळखता येऊ नये यासाठी त्यामध्ये कपडे धुण्याची डिटर्जंट पावडर तसेच शाम्पूची भेसळ केली जाते. त्यामुळे भेसळीचे दूध घट्ट व फेसाळ दिसते. भेसळ करताना दुधातील प्रथिनांचे (सीएनएफ) प्रमाण योग्य राखणे आवश्यक असते. दुधातील सीएनफ वाढवण्यासाठी शेतात खत म्हणून वापरला जाणारा युरिया मिसळला जातो. यामुळे डेअरिवर दूध तपासणीसाठी वापरला जाणारा लॅक्टोमीटर रिडिंगमध्ये दूध शुद्ध दिसते. प्रचंड भेसळ केल्यामुळे दूध आम्लयुक्त होऊ नये किंवा ते फाटू नये यासाठी त्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळला जातो. त्यामुळे खराब होऊ लागलेले दूध ताजे असल्यासारखे दिसते. या रसायनांमुळे भेसळ ओळखणारी लॅक्टोमीटर व फॅट टेस्टसारखी साधने फेल होतात. ही उपकरणे भेसळ ओळखू शकत नाहीत. त्यामुळे भेसळयुक्त दूध हे शुद्ध दूध म्हणून घेतले जाते.
जिल्ह्यात शेकडो डेअर्या असून एका डेअरीवर दिवसाला शेकडो लिटर दूध गोळा केले जाते. या टप्प्यात दुधात भेसळ केल्यानंतर पुढे ते डेअरी प्लांट्स, दूध संघ आणि त्यानंतर शहरी भागातील वितरकांमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाते. जिल्ह्याच्या ग्रमीण भागात दूध डेअर्यांचे जाळे आहे. मात्र या दूध डेअर्यांची नियमित तपासणी केली जात नसल्याने भेसळीचे प्रकार दुर्लक्षित राहतात. त्यामुळे भेसळखोरी करणार्या एका डेअरीचे दूध इतर दुधात मिसळून भेसळीचे जाळे तयार होते.
खवा, तूप असे उपपदार्थ बनवताना दूध शुद्ध आहे की भेसळीचे हे लक्षात येते. दुधातील भेसळ ही विशेषत: लहान मुले, गर्भवती महिला तसेच वृद्ध व पेशंटसाठी अत्यंत धोकादायक आहे. दूध डेअर्यांमधील भेसळ रोखण्यासाठी डेअर्यांना रासायनिक भेसळ चाचणी किट्स बंधनकारक करणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशासन तसेच पशुसंवर्धन विभागाने भेसळीविरोधात सतत संयुक्त मोहिमा राबवायला हव्यात. दूध डेअर्यांची नोंदणी व परवाना प्रक्रियेतील गुणवत्ता तपासणी बंधनकारक करणे आवश्यक आहे. दूधात भेसळ आढळल्यास परवाना रद्द करुन संबंधितावर कठोर करवाई करावी. तसेच अन्न व औषध विभागाने ग्राहकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. (क्रमश:)