

सातारा : दूध डेअर्या (दूध संकलन केंद्र) ते शीतकरण केंद्र (चिलिंग सेंटर) या टप्प्यांवरील होणार्या भेसळची प्रचंड चर्चा असते. मात्र, मोठे दूध संघ व बड्या दूध वितरकांकडूनही मोठ्या प्रमाणात विविध रसायनांची भेसळ केली जात असल्याची माहिती आहे. या टप्प्यावर एकाचवेळी हजारो-लाखो लिटर एकाचवेळी हाताळले जात असल्याने भेसळही प्रचंड प्रमाणात केली जाते. या टप्प्यावर हजारो लिटर बनावट दूध तयार केले जात असल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्ह्यातील शेकडो दूध डेअर्यांकडून संकलित होऊन थेट किंवा शीतकरण केंद्राकडून दूध संघ व वितरकांपर्यंत दूध पोहोचते आणि याच टप्प्यावर बड्या वितरकांचे भेसळखोरीतून दूध साम्राज्य निर्माण केल्याचे दिसते.
दूध संघ व वितरणाच्या पातळीवर सर्वाधिक पाण्याची भेसळ केली जाते. 100 लिटरमागे दुधात 20 ते 40 लिटर पाणी मिसळले जाते. त्यामुळे दुधाची घनता कमी होते. ही घनता पुन्हा वाढवण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. दुधात पाणी मिसळल्यामुळे कमी झालेले एसएनएफ वाढवण्यासाठी प्रति 100 लिटर 5 ते 10 ग्रॅम युरिया मिसळला जातो. त्यामुळे प्रयोगशाळेत दूध चाचणी पास होते. पाणी मिसळल्यामुळे दुधाला फेस येत नाही. त्यासाठी प्रति 100 लिटर 2 ते 5 मिली डिटर्जंट पावडर किंवा शाम्पू मिसळला जातो. यामुळे दूध ताजे व घट्ट दिसते. दुधाची घनता व रंग येण्यासाठी स्वस्तात मिळणारी स्किम्ड मिल्क पावडर मिसळली जाते. दूध जास्त काळ टिकवण्यसाठी हायड्रोजन पॅरॉक्साईड व फॉर्मेल्डिनहाईड या अत्यंत विषारी रसायनांचा वापर केला जातो. या रसायनांमुळे कॅन्सर होतो.
दूध संघ किंवा दूध वितरकांकडून या दुधाच्या नमुन्यांची स्वत:च तपासणी करत असल्याने भेसळयुक्त दूध सहज क्लिअर होऊन पिशव्यांमध्ये भरले जाते. पिशवीवर पाश्चरायज्ड व शुद्ध दूध असल्याचा खोटा दावाही बर्याचदा केलेला दिसतो. पाश्चरायझेशन न केलेले दूध संकलनानंतर 4 तासांत प्रक्रिया केंद्रापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. पाश्चरायझेशन केलेल्या दुधाची ४८ ते ७२ तासांत विक्री होणे आवश्यक असते. प्रत्येक बॅचची उत्पादन तारीख, वेळ व तापमानाची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. बरेच वितरक याकडे दुर्लक्ष करतात. प्रत्येक बॅचचे नमुने किमान तीन महिने जतन करणे आवश्यक असताना या नियमालाही फाटा दिला जातो. स्वतंत्र प्रयोगशाळा तपासणी बंधनकारक नसल्याने फेसळखोरांचे फावते. तसेच नोंदणी व परवान्यातही गोलमाल केल्याची चर्चा आहे.
दूध संघ किंवा बड्या दूध वितरकांकडून केल्या जाणार्या भेसळीला पायबंद घालणे आवश्यक आहे. अन्न व औषध प्रशाासनाने दूध संघ व दूध वितकरांच्या प्रक्रिया केंद्रावरील दूध टाक्या तसेच भरून येणार्या दूध टँकरमधून तपासणीसाठी नमुने घ्यायला हवेत. ग्राहकांना वितरित करणार्या दूध पिशव्यांमधील दूध शुद्ध की भेसळीचे आहे, याचीही तपासणी होण्यासाठी नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवायला हवेत. एनएबीएल प्रयोगशाळेत या नमुन्यांची स्वतंत्र चाचणी बंधनकारक करावी. प्रत्येक बॅचची डिजिटल नोंद व जीपीएस ट्रॅकिंग सक्ती करावी. भेसळ आढळल्यास परवाना तात्काळ रद्द करून फौजदारी कारवाई करावी. दूध संघ व वितरक हे भेसळीच्या साखळीतील सर्वात मोठा टप्पा मानला जातो. या टप्प्यात निर्माण होणारे भेसळीचे दूध लाखो ग्राहकांपर्यंत वितरीत होते. त्यामुळे या टप्प्यातील भेसळीवर नियंत्रण नसेल तर खालच्या स्तरावर कितीही प्रयत्न केले तरी त्याचा फारसा उपयोग होत नाही.