

म्हसवड : म्हसवडचे माजी नगराध्यक्ष दत्तोपंत भागवत यांचा मुलगा अभियंता आनंद भागवत यांचे दोन महिला व तीन युवकांनी पिलीव घाटातून अपहरण करून मारहाण केली. संशयितांनी रोख रक्कम, सोन्याची अंगठी तसेच ऑनलाईन व्यवहारातून सुमारे १ लाख ८९ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी माळशिरस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भागवत हे कामानिमित्त पिलीव येथे गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते दुचाकीवरून म्हसवडकडे परतत असताना पिलीव घाटाच्या सुरुवातीला तीन युवक व दोन महिलांनी त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने एका कारमध्ये बसवून माळशिरस येथील पाणीव परिसरात नेण्यात आले. तेथे चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यांच्या जवळील रोख २० हजार रुपये, सोन्याची अंगठी तसेच मोबाईलद्वारे ऑनलाईन व्यवहार करून ९९ हजारांची रक्कम काढून घेतली.
भागवत यांचा मोबाईल बंद लागत असल्याने त्यांच्या पत्नीला संशय आला. त्यांनी शनिवारी रात्री म्हसवड पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी पिलीव घाट परिसरात शोधमोहीम राबवली. रात्री उशिरा भागवत यांनी पत्नीशी संपर्क साधून घरी पोहोचल्याची माहिती दिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. घटनेचे ठिकाण माळशिरस पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संबंधित ठाण्यात तक्रार देण्यात आली. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा पोलिस अधीक्षकांना घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सखोल तपास करण्याच्या सूचना दिल्या.
टोळीचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान
महिलांचा वापर करून लिफ्ट मागणे, त्यानंतर अपहरण, मारहाण, लूट आणि बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ब्लॅकमेल करण्याच्या पद्धतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या टोळीचा पर्दाफाश करण्याचे मोठे आव्हान माळशिरस पोलिसांसमोर उभे राहिले आहे.