Satara News : जूनमधील अत्यल्प पाऊस चिंता वाढवणारा

पश्चिम वीजनिर्मिती बऱ्याच अंशी ठप्प; पूर्वेकडे पिण्यासाठी अत्यल्प पाण्याचा विसर्ग
Satara News
कोयना धरण
Published on
Updated on

गणेशचंद्र पिसाळ

कराड : गतवर्षी १५ मेपासून कोयना धरणांतर्गत विभागासह बहुतांश ठिकाणी पावसाला सुरुवात झाली होती. यावर्षी १० जून उलटूनही अद्याप अपेक्षित मान्सून अथवा मान्सूनपूर्व पाऊस पडला नसल्याने धरणातील पाण्यावर अवलंबून सिंचन आणि वीजनिर्मितीचा प्रश्न अधिकाधिक गंभीर व चिंताजनक बनत चालला आहे. जून महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांत अत्यल्प पावसाची नोंद कोयना, नवजा व महाबळेश्वर या धरणांतर्गत विभागात झाली आहे.

यावर्षी हवामान खात्याकडून मुळातच कमी पाऊस, अल निनोचा धोका या भीतीचे सावट घोंगावत असतानाच अद्यापही पावसाची प्रतीक्षा ही सार्वत्रिक चिंता वाढवणारी ठरत आहे. सध्या कोयना धरणातील पाण्यावर अपवाद वगळता बहुतांश पश्चिम वीजनिर्मिती ठप्प आहे तर पूर्वेकडे अत्यल्प प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी पाणी सोडले जात आहे. आगामी जलवर्षातील सिंचन व वीजनिर्मितीचा विचार करता आता लवकरात लवकर अपेक्षित पाऊस सार्वत्रिक हिताचा ठरणार आहे.

निम्म्याहून अधिक महाराष्ट्राची सिंचन व विजेची गरज भागवत पूर्वेकडील कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यांच्या सिंचनाचा प्रश्न सोडवणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर या जलवर्षात किमान स्थानिक पाण्याची गरज भागणार का याबाबत संभ्रम व संशय व्यक्त होत असल्याने सार्वत्रिक भीती वाढतच चालली आहे. हवामान खात्याने यावर्षी कमी पाऊस व अल निनोचा धोका जाहीर केल्याने या चिंतेत वाढच होत आहे. वास्तविक गतवर्षी १५ मे नंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे त्या दरम्यान पूर्वेकडे सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची मागणी बंद झाली तर पश्चिम जलविद्युत निर्मितीसाठी अपेक्षित पाणी सोडता येणे शक्य झाले होते. मात्र यावर्षी एका बाजूला हवामान खात्याने व्यक्त केलेल्या चिंता तर दुसरीकडे आता १० जून उलटून गेला तरी अद्यापही मान्सून पूर्व अथवा मान्सूनचा पाऊस नसल्याने चिंता वाढली आहे.

गतवर्षी जूनच्या पहिल्या दहा दिवसात येथे अपेक्षित पाऊस पडल्याने त्या काळात सरासरी धरणात २२.५८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. सध्या तो १४.६९ टीएमसी असून अद्यापही अपेक्षित पाऊस पडलेला नाही. वास्तविक या दरम्यान मोठ्या प्रमाणावर अपेक्षित पाऊस पडला तर धरणात पाणी साठवण व्हायला त्यानंतर काही दिवसांचा कालावधी जातो, कारण पहिल्या पावसात पडणारे पाणी हे पूर्णपणे स्थानिक जमिनीत मुरते आणि काही काळानंतरच पाणीसाठ्यामध्ये वाढ व्हायला सुरुवात होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news