

सागर गुजर
सातारा : बिबट्या दिसला किंवा त्याने पाळीव प्राण्याची शिकार केली की वनविभागाने पिंजरा बसवावा, अशी स्थानिक लोकांकडून मागणी होत असते. मात्र, पिंजरा बसवून समस्या सुटण्याऐवजी आणखी जटील होते. कारण एक बिबट्या पिंजऱ्यात पकडला तरी दुसरा बिबट्या त्याच्या टेरिटेरित दाखल होतो. ही बिबट्यांची नैसर्गिक जीवनशैली आहे. मात्र, दुसऱ्या जागेवरुन दाखल झालेल्या बिबट्याला नवीन अधिवासातील घडामोडींचा अंदाज नसल्याने तो अधिक त्रासदायक ठरु शकतो.
वन्यजीव अभ्यासकांच्या माहितीनुसार जेव्हा एक बिबट्या पकडला जातो किंवा त्याला एका ठिकाणाहून हलवलं जातं. तेव्हा त्याची जागा लगेच दुसरा बिबट्या घेतो. याचं मुख्य कारण म्हणजे बिबट्यांच्या वावरण्याच्या क्षेत्राची (टेरिटरी) एक नैसर्गिक रचना असते, जिथे अन्न, पाणी आणि लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध असते. त्यामुळे एक बिबट्या गेल्यावर त्या भागात दुसरा बिबट्या येतो. यामुळे फक्त पिंजरे लावून बिबट्यांची समस्या सुटत नाही कारण याने त्यांच्या नैसर्गिक अधिवासातील संतुलन बिघडते आणि संघर्ष कायम राहतो. राज्य शासनाने सातारा जिल्ह्यासाठी 20 पिंजरे दिले आहेत. मात्र, महाबळेश्वर वगळता कुठेही या पिंजऱ्यांमध्ये बिबटा पकडला गेला नाही. त्यातूनही बिबट्या पकडला गेल्यास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्याचीही समस्या आहे. यासाठी बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये लोकांना बिबट्यासोबत कसे राहायचे? याचे प्रशिक्षण देणे जरुरीचे आहे. यासोबत मोठाले चर काढणे, सायरन व्यवस्था करणे असे उपाय फायद्याचे ठरत आहेत.
ज्या भागात बिबट्या राहतो, तिथे त्याला पुरेसे अन्न (कुत्रे, शेळ्या, पाळीव प्राणी) आणि सुरक्षित निवारा (ऊसाची शेती, झुडपे) मिळतात. एक बिबट्या पकडल्यावर हे नैसर्गिक स्त्रोत उपलब्ध असल्याने दुसरा बिबट्या आकर्षित होतो. प्रत्येक बिबट्याचे एक ठरलेले क्षेत्र (होम रेंज) असते. एक बिबट्या काढल्यानंतर, त्या क्षेत्राची पोकळी भरून काढण्यासाठी दुसरा बिबट्या नैसर्गिकरित्या येतो. मानवी वस्तीजवळ येणाऱ्या बिबट्याला इथले वातावरण आणि संसाधने सोयीस्कर वाटतात. यामुळे तो एका ठिकाणाहून पकडला गेला तरी, दुसऱ्या बिबट्यासाठी ती जागा सोयीची ठरते.