Satara News : गोल्फ मैदानावर उत्खनन व वृक्षतोड

प्रांताधिकार्‍यांच्‍या पाहणीत प्रकार उघड : तहसीलदार, मुख्‍याधिकार्‍यांच्‍या भूमिकेवर प्रश्‍नचिन्‍ह
Tree Felling
गोल्फ मैदानावर उत्खनन व वृक्षतोड
Published on
Updated on

प्रेषित गांधी

महाबळेश्‍वर : महाबळेश्‍वर पालिका हद्दीतील हेरिटेज ग्रेड १ मिळकतीमध्ये समाविष्ट ‘द क्लब’ मालकीच्या गोल्फ मैदान परिसरात उत्‍खनन करून वृक्षतोड केल्‍याची धक्‍कादायक बाब प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्‍या पाहणीत आढळून आली आहे. निसर्गाचे लचके तोडत झाडे तोडून तीन रस्‍ते व शेडची उभारणी करण्‍यात आल्‍याने खळबळ उडाली आहे. पालिका हद्द व तहसील कार्यालयापासून हाकेच्‍या अंतरावर हा प्रकार असताना तहसीलदार व मुख्‍याधिकारी यांच्‍या भूमिकेवर सवाल उपस्‍थित होत आहेत.

गोल्‍फ मैदानावर तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडून कोणतीही शहानिशा न करता मैदानाचे सपाटीकरण करून गवत लागवडीसाठी परवानगी दिली गेली. मात्र, ‘द क्लब’ ने या परवानगीचा आधार घेत चौकटीबाहेर जाऊन बेसुमार उत्खनन केले व गवत लागवड न करता मैदानावरच मातीचे ढिगारे उभे करून टेकड्या उभारल्‍या. आजूबाजूचे जंगल नष्ट करून अंतर्गत तीन रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. यामध्‍ये अंजन, जांभुळ अशा विविध जातींची तब्बल ३० हून अधिक झाडांची कत्तल करून ही झाडे कुणालाही कुणकुण लागू नये म्हणून जमिनीखाली गाडण्यात आली. आणखी देखील अनेक झाडे या मैदानात गाडण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मैदानास चहूबाजूंनी आठ ते नऊ फुटांचे तारेचे कंपाऊंड करण्यात आले असून, विनापरवाना अनधिकृत मोठ्याच्या मोठ्या पत्र्याच्‍या शेडचीदेखील उभारणी केली आहे. रस्त्याला टाळे ठोकल्यामुळे दररोज फिरण्यासाठी जाणाऱ्या स्थानिकांची अडचण झाली. यावर तक्रार करूनही मैदानात जाण्‍यास ‘द क्‍लब’ व्‍यवस्‍थापनाकडून मज्‍जाव करण्‍यात आला.

यानंतर याची तक्रार बॉम्बे एन्व्हायर्नमेंटल ॲक्शन ग्रुपचे अनिल पंडित व पर्यावरणप्रेमी बाळासाहेब पांचाळ यांनी वाई उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्याकडे केली होती. याची दखल घेत प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी गुरुवारी सकाळी या गोल्फ मैदानाची स्थळ पाहणी केली. यामध्‍ये वृक्षतोड व अनधिकृतरित्‍या शेडची उभारणी केल्‍याचे निदर्शनास आले. यावर डॉ. खरमाटे यांनी मुख्‍याधिकारी योगेश पाटील व वृक्ष अधिकारी कल्‍याण हिवरे यांना विचारणा केली असता त्‍यांनी काहीच माहिती नसल्‍याचे सांगितले. तर तहसीलदार सचिन मस्‍के यांनी परवानगी व्यतिरिक्त इतर कामे सुरू असल्याची माहिती प्रशासनाला नसल्‍याचे सांगितले. यावर प्रांताधिकार्‍यांनी नाराजी व्‍यक्‍त केली. तसेच पालिका, महसूल आणि वन विभागाला पंचनामा करण्‍याचे व अटींचा भंग झाल्‍यास फौजदारी करण्‍याचे आदेश दिले.

महाबळेश्वर तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गोल्फ मैदानात सुरू असलेल्या या प्रकाराची माहिती तहसीलदार सचिन मस्के यांना कशी नव्हती? असा सवाल उपस्थित होत आहे. पालिका हद्दीत येत असलेल्या या गोल्फ मैदानात विनापरवाना उभारण्यात आलेले शेड, उंच कंपाऊंड व वृक्षतोडीच्या गंभीर प्रकारावर मुख्याधिकारी योगेश पाटील अनभिज्ञ कसे? निसर्गाचे लचके तोडले जात असताना या दोन्ही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षपणावर प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्‍यान, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पालिका हद्दीत व तहसील कार्यालयाशेजारी दिवसाढवळ्या बेफामपणे गोल्फ मैदानावरील सुरू असलेल्‍या उद्योगाची कल्‍पना तहसीलदार व मुख्‍याधिकार्‍यांना नसल्‍याबद्दल महाबळेश्‍वरवासीयांनी संताप व्‍यक्‍त केला आहे. या संयुक्त पाहणीप्रसंगी तहसीलदार सचिन मस्के, मुख्याधिकारी योगेश पाटील, तक्रारदार अनिल पंडित, सूर्यकांत पांचाळ, वृक्ष अधिकारी कल्याण हिवरे, तलाठी सागर शिंदे, वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे, लहू राऊत, पालिका मुख्य लिपिक बबन जाधव, कर निरीक्षक अमित माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी लक्ष देतील का?

महाबळेश्‍वरच्‍या अधिकार्‍यांच्‍या कार्यपद्धतीबाबत गेले काही दिवस जाहीरपणे चर्चा होत आहे. सातार्‍याचे जिल्‍हाधिकारी संतोष पाटील हे कार्यक्षम व क्‍लिन इमेजचे अधिकारी म्‍हणून ओळखले जातात. महाबळेश्‍वरमधल्‍या या प्रकारांबाबत त्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांची झाडाझडती घ्‍यायला हवी, अशी महाबळेश्‍वरकरांची अपेक्षा आहे. जिल्‍हाधिकारी संतोष पाटील या प्रकरणात लक्ष देतील का? असा सवाल विचारला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news