Satara News: दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावर ‘कोंडी’चा कहर!

सेवा रस्त्याचे काम गर्दीच्या वेळेत; तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा
Satara News: दुरुस्तीच्या नावाखाली महामार्गावर ‘कोंडी’चा कहर!
Published on
Updated on

खंडाळा : पारगाव, ता. खंडाळा नजीक उड्डाणपुलाजवळ सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम ऐन वाहतुकीच्या गर्दीच्या वेळेत हाती घेण्यात आल्याने मंगळवारी वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. दुपारपासून सुरू असलेल्या कामामुळे सायंकाळी चारनंतर वाहतुकीचा बोजवारा उडाला. उड्डाणपुलापासून पारगावच्या मागील बाजूपर्यंत तब्बल तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. रात्री आठ वाजेपर्यंत कोंडी कायम राहिल्याने नागरिक हैराण झाले.

पारगावजवळील उड्डाणपुलानजीक सातारा बाजूकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत असल्याने खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, काम करताना सेवा रस्त्याची एकच मार्गिका वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात आली. महामार्गावरून तीन-चार मार्गिकांमधून येणारी वाहने सेवा रस्त्यावर आल्यानंतर एकाच मार्गिकेत अडकू लागली आणि काही वेळातच वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला.

सायंकाळी चारनंतर वाहनांची संख्या वाढताच परिस्थिती गंभीर बनली. उड्डाणपुलापासून पारगावच्या मागील बाजूपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. चारचाकी, अवजड वाहने तसेच प्रवासी वाहनांमुळे कोंडीत भर पडत गेली. कामाच्या ठिकाणी वाहतुकीचे योग्य नियोजन नसल्याने चालकांना बराच वेळ जागेवरच खोळंबून राहावे लागले.

वाहतूक कोंडी वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी परिस्थिती हाताळण्यासाठी धाव घेतली. सायंकाळच्या गर्दीच्या वेळी बसस्थानकाजवळील उड्डाणपुलाखालून वाहतूक वळवण्यात आली. पुणे बाजूकडील सेवा रस्त्याने जुन्या टोलनाक्याच्या पुलाखालून वाहतूक पुन्हा सातारा बाजूकडे वळवण्यात आली. या पर्यायी मार्गामुळे वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी झाला. रात्री आठच्या सुमारास वाहतूक सुरळीत झाली.

सेवा रस्त्यावरील खड्डे बुजवणे गरजेचे आहे. मात्र, त्यासाठी वाहतुकीचे नियोजन न करता ऐन गर्दीच्या वेळेत काम सुरू केल्यास त्याचा फटका वाहनचालक व प्रवाशांना बसतो. रस्ते विकास महामंडळाने दुरुस्तीची कामे सुरू करण्यापूर्वी वाहतुकीचे नियोजन करावे, पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा आणि गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news