

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी व पंचायत समित्यांच्या 130 गणांसाठी आरक्षणाची लॉटरी सोमवारी फुटणार आहे. त्यामुळे इच्छुकांना चांगलीच धास्ती लागली आहे. आपल्याला सोयीचे आरक्षण मिळावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे.
जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत निघणार आहे. तर पंचायत समित्यांसाठी त्या-त्या तालुक्यात आरक्षण सोडत निघणार आहे. आरक्षण सोडतीत अनुसूचित जमातीसाठी 1 गट राखीव, अनुसूचित जातीसाठी 7, सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी 40, ओबीसीसाठी किमान 17 गट राखीव राहण्याचा अंदाज आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षणाची लॉटरी सोमवारी फुटणार आहे. या आरक्षण सोडतीकडे जिल्ह्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. गट व गणामध्ये आपल्याला अनुकूल असे आरक्षण पडावे यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. तसेच या आरक्षण सोडतीत कुणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला लॉटरी लागणार याची उत्कंठा लागून राहिली आहे.
जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात 2 गट व 4 गण, वाई तालुक्यात 4 गट व 8 गण, फलटण तालुक्यात 8 गट व 16 गण, खंडाळा तालुक्यात 3 गट व 6 गण, माण तालुक्यात 5 गट व 10 गण, कोरेगाव तालुक्यात 6 गट व 12 गण, खटाव तालुक्यात 7 गट व 14 गण, सातारा तालुक्यात 8 गट व 16 गण, जावली तालुक्यात 3 गट व 6 गण, पाटण तालुक्यात 7 गट व 14 गण, कराड तालुक्यात 12 गट व 24 गण असे मिळून 65 गट व 130 गणांसाठी सोमवारी आरक्षण सोडत निघणार आहे.