

आदेश खताळ
सातारा : अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्हाभर ठिकठिकाणी धाडी टाकायला सुरूवात केली आहे. तक्रारींचे स्वरूप लक्षात घेऊन गंभीर प्रकरणांना प्राधान्य देऊन तीव्र कारवाया सुरू केल्या आहेत. त्यामुळे भेसळखोरांची तंतरली आहे. सातारा, कोरेगाव, माण, खटाव, खंडाळा, महाबळेश्वर येथून दूध डेअर्या, चिलिंग सेंटर्स (दूध शितकरण केंद्र), दुध संघ तसेच खाजगी दूध वितरकांकडून दूधाचे शेकडो नमुने घेण्यात आल्याने दूध सम्राटांमध्ये खळबळ माजली आहे. हॉटेल्स, ढाबे, रेस्टाॅरंट, उपहारगृहांनाही दणका देत अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा धडाका लावला आहे.
जिल्ह्यातील दूध भेसळखोरांकडून प्रचंड बोगस दूध तयार करण्यात येत असल्याने सामाजिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. दै. 'पुढारी'ने सुरू केलेल्या 'पांढर्या दुधातील काळे बोके' या वृत्तमालिकेनंतर भेसळखोरांविरोधात जिल्ह्यातून प्रचंड तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा अन्न व औषध विभाग अॅक्शन मोडवर आला आहे. जिल्ह्यातील प्रमुख काही तालुक्यांवर फोकस करण्यात आले असून त्याठिकाणी भेसळीचे प्रकार सुरू असल्याचा अन्न सुरक्षा अधिकार्यांचा संशय आहे. त्यावरून दूध भेसळीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येत आहेत. तक्रारींचे स्वरूप व गांभीर्य लक्षात घेऊन पथकांनी जिल्ह्याच्या कानाकोपर्यात धाडी टाकायला सुरूवात केली आहे.
दूध डेअर्या, चिलिंग सेंटर्स (दूध शितकरण केंद्र), दुध संघ तसेच खाजगी दूध वितरक यांच्यासह किरकोळ दूध विक्रेत्यांकडून सँपल घेण्यात आले आहेत. भेसळ तपासणीसाठी हे दुधाचे नमुने पुणे प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. लवकर प्रयोगशाळेचे अहवाल प्राप्त होणार आहेत. त्यानंतर भेसळखोरांना दंड होण्याची शक्यता आहे. तसेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. कारवाईच्या भीतीने अनेक दुध डेअरीचालकांनी तात्पुरता व्यवसाय बंद केल्याची माहिती आहे. चिलिंग सेंटर चालकांमध्येही खळबळ माजली आहे. काही चिलिंग सेंटर्स बंद करण्यात आली असून इतरांवर कारवाई करण्यात येत आहे. दूध वितरकांनी भेसळीचे साहित्य लपवण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे. खाजगी दूध संघांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे भेसळखोरांची तंततरली आहे. दूध सम्राटांमध्ये खळबळ माजली आहे.
(क्रमश:)