

सातारा : परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्र राज्यात चोरट्या मार्गाने दारू वाहतुकीचा पर्दाफाश राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साईज) भरारी पथकाने केला. दारूचे १,५५० बॉक्स असलेला कंटेनरच जप्त केला आहे. सातारा व मुंबई पथकाने केलेल्या या कारवाईत १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
नंदराम नानकिया भुरिया, विनोद मदन गनावे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्कचे भरारी पथक मुंबई व भरारी पथक सातारा या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. दारूची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार सातारा व मुंबई एक्साईजचे पथक सातार्यात लक्ष ठेवून होते. हॉटेल रंगीला राजस्थान समोर, सातारा-लोणंद रोडवरील तडवळे स. वाघोली (ता. कोरेगाव) या हद्दीत दारूचा कंटेनर पकडला. महाराष्ट्र दारूबंदी गुन्ह्यांंतर्गत पाळत ठेवून गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचे १,५५० बॉक्स तसेच दहा चाकी ट्रक कंटेनर क्र. एन एल ०१ एएफ ३५४९ हे वाहन होते.
दरम्यान, अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक याबाबत कोणतीही तक्रार असल्यास एक्साईज विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर १८००८३३३३३३ संपर्क साधण्याचे आवाहन केलेे आहे. ही कारवाई एक्साईजचे अधिकारी रियाज खान, विजयकुमार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.