

आदेश खताळ
सातारा : सातारा पालिकेतील बरेच ठेके वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. पैसे खाण्याचे नवनवे फंडे काढले जात आहेत. सातारकरांच्या पैशावर हे ठेकेदार महिन्याला कोट्यवधींचा दरोडा टाकत आहेत. ‘खाई त्याला खवखवे’ अशी परिस्थिती असल्याने खाबुगिरी माजली आहे. एका विभागाने विविध कामांसाठी कर्मचारी पुरवण्यासाठी काढलेले ठेके भ्रष्टाचाराचं कुरण बनलं आहे. कर्मचारी ठेक्यांच्या नावाखाली जोरदार लाटालाटी सुरू असून, नगरपालिकेत पैसे खाण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. हा प्रकार माहीत असूनसुद्धा या ठेक्यांची बिलेही बिनबोभाट निघत आहेत. सातारा पालिका वर्तुळात या बोगसबाजीची जोरदार चर्चा आहे.
सातारा पालिकेच्या एका विभागात विविध कामांसाठी कर्मचारी पुरवण्याचे ठेके काढण्यात आले आहेत. त्यामध्ये एक टेंडर २० कर्मचारी पुरवण्याचे आहे. प्रत्येक कर्मचार्याला २४ हजार ६० रुपये पगार ठरला आहे. मात्र, या ठेक्यांतर्गत घेतलेले बहुतांश कर्मचारी गायब आहेत. २-३ कर्मचार्यांकडून किरकोळ काम करून घेण्यात येते. या ठेक्यातून नगरपालिकेला फायदा होण्यापेक्षा लाखोंचा खड्डा पडत आहे. मात्र, या ठेक्यापोटी महिन्याला ४ लाख ८० हजारांचे बिल काढण्यात येत आहे. एवढ्याच रकमेचे आणखी एक टेंडर काढण्यात आले आहे. या ठेक्यातही २० कर्मचारी ठेक्यावर घेण्यात आले. मात्र हे कर्मचारी कुठेही दिसत नाहीत.
१० कर्मचार्यांसाठी आणखी एक टेंडर काढण्यात आले आहे. या ठेक्यासाठी महिन्याला २ लाख ४० हजारांची बिले काढण्यात येत आहेत. या ठेक्यावरील कर्मचार्यांवर सोपवलेली जबाबदारी पाहिली तर त्यातून नगरपालिकेला किती फायदा झाला, हा संशोधनाचा विषय ठरेल. शाहूपुरी भागासाठी एक टेंडर काढण्यात आले. यामध्ये एका कामासाठी ५ कर्मचार्यांचे महिना १ लाख ४४ हजार याप्रमाणे बिल निघते. ठेका घेतलेला हा कार्यकर्ता नगरसेवक होता होता राहिला. वास्तविक, ज्या कामासाठी हे टेंडर काढण्यात आले ते काम संबंधित विभागाचे असून, त्या विभागाकडे तेवढे मनुष्यबळही आहे. असे बरेच ठेेके सुरू असून, ठेकेदारांकडून सातारकरांच्या पैशावर महिन्याला कोट्यवधींचा डल्ला मारला जात आहे.
केवळ कुणाची तरी सोय व्हावी या हेतूने हे ठेके काढण्यात आल्याचे दिसते. मागील एका सर्वसाधारण सभेत अशाच एका बोगस ठेक्यावर कारवाई म्हणून त्या ठेकेदाराला काळ्या यादीत घातले. पण इतर ठेक्यांचे काय? या विभागात ८ ठेकेदारांना १७ ठेके देण्यात आले आहेत. सातारा पालिकेकडे कायम असलेले २८० कर्मचारी आहेत. तरीही ठेक्यावर ४३० कर्मचारी घेण्यात आले असून, त्यावर कोट्यवधींचा खर्च होत आहे.
सातारकरांचा पैसा सरळ ठेकेदाराच्या घशात घातला जात आहे का? बोगस कर्मचारी दाखवून मलई ओरपली जात असताना जे कर्मचारी कामावर असतात, त्यांच्या हातावर ७ ते ८ हजार रुपये टेकवले जात आहेत. कर्मचार्यांचा उर्वरित १४ ते १५ हजार रुपयांचा पगार ठेकेदार हाणत आहेत. या कर्मचार्यांचे बँक पासबुक, एटीएम व त्याचा पासवर्ड ठेकेदार स्वत:कडे ठेवतो. यावर सर्वसाधारण सभेतही चर्चा झाली. मात्र, अनेकांचे लागेबांधे असल्यामुळे यावर आता कुणी बोलत नाही. ठेकेदाराचा हा खेळ फक्त एकाच विभागात आहे असे नाही, इतर विभागांतही अशीच बजबजपुरी माजली आहे. हॉटेल फर्न येथे दोन्ही नेत्यांसमोरही यावर चर्चा झाली. मात्र, यामध्ये अद्यापही सुधारणा न झाल्याने नगरसेवक व प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर शंका घेतली जात आहे.