

सातारा : येथील समर्थ मंदिर चौक ते बोगदा मार्गावरील अतिक्रमित 20 मिळकती पालिकेने जमीनदोस्त केल्या. वाढती अतिक्रमणे व रस्ता रूंदीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली. र्यावेळी अधिकारी आणि मिळकतदारांमध्ये वादावादी झाली. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई केली असून उद्याही अतिक्रमणविरोधी मोहिम सुरूच राहणार आहे.
शाहू चौक-समर्थ मंदिर चौक ते बोगदा या मार्गाचे रूंदीकरण होत आहे. सध्या 10-12 मीटरच रस्ता असल्याने ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. विशेषकरून टोपेमामा मंदिर ते बोगदा या मार्गावर वाहतूक अधिक गुंतागुंतीची होती. अतिक्रमणे आणि जीर्ण झालेल्या इमारती धोकादायक झाल्या होत्या. त्यातच रूंदीकरणही आवश्यक झाल्याने पालिकेच्या शहर नियोजन विभागाने संबंधित 52 मिळकतदार तसेच अतिक्रणधारकांना कारवाईच्या इशारा नोटिसा दिल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष केल्याने संबंधित मिळकतदारांना पालिकेने दणका दिला. पहिल्या टप्प्यात स्वत:हून अतिक्रमणे काढून घेऊन काहीजणांनी सहकार्य केले. मात्र त्यानंतर विरोध होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने पोलिस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणविरोधी मोहीम सुरू केली. सोमवारी झालेल्या कारवाईत पालिकेने 20 मिळकती जमीनदोस्त केल्या. यावेळी काही मिळकतदारांनी विरोध केला. अधिकारी, कर्मचारी तसेच मिळकतदारांमध्ये बाचाबाचीचे प्रसंगी निर्माण झाले. मात्र पोलिसांनी हा विरोध मोडून काढल्याने पालिकेने तीव्र कारवाईचे सत्र अवलंबले.
या कारवाईनंतर रस्ताची रूंदी सुमारे 5 ते 7 मीटरने वाढली. या मार्गाने मोकळा श्वास घेतला. मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण हटाव विभाग प्रमुख प्रशांत निकम, पाणीपुरवठा अभियंता शहाजी वठारे, नगररचनाकार तुषार मदने, नगर अभियंता दहिफळे, विद्युत अभियंता अविनाश शिंदे यांच्यासह स्थावर जिंदगी विभाग व आरोग्य विभागाने ही संयुक्त कारवाई केली. पालिकेचे 150 कर्मचारी या कारवाईत गुंतले होते. सातारा पोलिस उपविभागीय अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोनि सचिन म्हेत्रे, शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोनि संग्राम शेवाळे यांच्यासह 22 पोलिस कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतल्याने बळ मिळाले. एसआरपीच्या तुकडीचीही मदत घेतली