Satara News: रब्बीसाठी 1 लाख 6 हजार टन खताचा साठा
सातारा : रब्बी हंगामात खतांचा तुटवडा भासू नये, शेतकऱ्यांना शेतीच्या कामात अडथळा येवू नये यासाठी सातारा जिल्हा परिषदेने 1 लाख 6 हजार मेंट्रीक टन खतांचा साठा मंजूर केला आहे. त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. खताचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषि विभाग अलर्ट झाला आहे.
सध्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. तर काही ठिकाणी पेरण्यांची लगबग सुरु आहे. जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाने खताचे नियोजन करुन शेतकऱ्यापर्यंत योग्य वेळी खताचा पुरवठा व्हावा यासाठी काटेकोर व्यवस्था करण्यात आली आहे. या साठ्यात युरिया, डीएपी, एनपीके, सुपर फॉस्फेट, पोटॅश, संयुक्त खतांचा समावेश आहे. खत वितरण, केंद्रांना वेळेत साठा पोहोचावा यासाठी जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि सहकारी संस्थांमध्ये समन्वय साधण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या या निर्णयामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतासाठी दारोदार भटकंती करावी लागणार नाही. योग्य, नियोजन, पुरेसा साठा आणि प्रशासनाचा तत्पर प्रतिसाद यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
रब्बी हंगामातील 1 लाख 6 हजार 250 मेट्रिक टन खते मंजूर केली आहेत. यामध्ये सद्यस्थितीत गेल्या हंगामातील खते व रब्बीतील खते, असे मिळून 49 हजार 208 मेट्रिक टन खते उपलब्ध झाली आहेत. 5 हजार 991 मेट्रिक टन चालू हंगामातील खते प्राप्त झाली असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.

