

सातारा : सातारा शहरातील खणआळी चौकातील रिक्षा स्टॉपजवळ रविवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीकडून मटणाचे पातेले, दारूची बाटली, नारळ आणि इतर अनेक वस्तू संशयास्पदरितीने ठेवण्यात आल्याचे आढळून आले. या प्रकाराची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पहाटेच्या सुमारास खणआळी चौकातील रिक्षास्टॉपजवळील मोकळ्या जागी एका अज्ञात व्यक्तीने काही वस्तू मांडून ठेवल्या होत्या. यामध्ये एका मोठ्या टोपामध्ये मांसाहारी पदार्थ, काही फळे, दारूची बाटली, नारळ, पूजेच्या साहित्यासारखी वस्तू, चाव्या आणि इतर काही संशयास्पद गोष्टी मांडून ठेवल्या होत्या. सकाळी रिक्षाचालक आणि परिसरातील नागरिक नेहमीप्रमाणे आले असता, त्यांना हे दृश्य पाहून मोठा धक्का बसला. या वस्तू कुणी आणि कोणत्या उद्देशाने ठेवल्या असतील, याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. अनेकजण याकडे एका अंधश्रद्धेतून केलेल्या 'विधी' म्हणून पाहत आहेत.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य सभापती धनंजय जांभळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मांडलेल्या सर्व वस्तूंची पाहणी केली. या कृत्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात येईल आणि दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे जांभळे यांनी सांगितले.