

सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रयत्नांतून राज्य शासनाने सातार्याच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा खोवणारा निर्णय घेतला आहे. सातार्यातील श्री शाहू कलामंदिरच्या नव्याने उभारणीसाठी तब्बल ७२ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हा निधी सातारा पालिकेला प्राप्त होणार आहे. मंत्री शिवेंद्रराजे यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सातारकरांना दिलेले हे बहुमोल गिफ्ट ठरले आहे.
सध्याच्या श्री शाहू कलामंदिरमध्ये नाट्यकर्मींना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याचे वातानुकूलित असलेले हे नाट्यगृह ८०० आसन क्षमतेचे आहे. हे नाट्यगृह पाडून त्या जागी अत्याधुनिक नाट्यगृहाची उभारणी करण्यात येणार आहे. नव्या नाट्यगृहात प्रशस्त पार्किंग व्यवस्था असेल. येथे दोन ऑडिटोरियम असतील. पहिले ऑडिटोरियम १ हजार प्रेक्षक क्षमतेचे व दुसरे ३०० प्रेक्षक क्षमतेचे असेल. दर्जेदार ध्वनियंत्रणा, आकर्षक व्यासपीठ आणि विंगांची कलात्मक रचना ही या नाट्यगृहाची वैशिष्ट्ये असतील. पुणे, मुंबई व इतर शहरांतील नाट्यगृहांची पाहणी करून त्याठिकाणी नाट्यकर्मींना जाणवणार्या त्रुटीं दूर करत सातार्यात परिपूर्ण व उत्कृष्ट नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. त्यातून त्यांनी सातार्यात राज्यातील आदर्श नाट्यगृह साकारण्याचा त्यांचा मानस असल्याचे दिसते.
कलावंतांना नाट्यप्रयोगाची रंगीत तालीम करता यावी यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सुसज्ज कँटिनची सुविधाही असेल. त्यामुळे नाट्यकर्मी, कलावंत व तंत्रज्ञ यांना आवश्यक सर्व सोयी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. सातारकर प्रेक्षकांनाही आरामदायी आसन व्यवस्था, उत्तम ध्वनी व वातानुकूलित वातावरणात नाट्यानुभव घेता येणार आहे. श्री शाहू कलामंदिराच्या रूपाने सातार्याला मिळणारी ही दिवाळी भेट सांस्कृतिक क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
सातार्याचे सांस्कृतिक महत्त्व वाढणार
श्री शाहू कलामंदिर या अत्याधुनिक नाट्यगृहामुळे सातार्यातील नाट्यचळवळीला नवी ऊर्जा मिळणार आहे. तसेच पुणे-मुंबईतील नामवंत नाट्यसंस्थांचे प्रयोग सातार्यात होण्यास चालना मिळून परिणामी सातार्याचे सांस्कृतिक महत्त्व वाढणार आहे. गेल्याच आठवड्यात शिवेंद्रराजेंनी शिवतीर्थ विकासासाठी ६ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून घेतला होता. आता श्री शाहू कलामंदिरसाठी ७२ कोटींचा निधी मिळाल्याने त्यांच्या विकासाभिमुख कार्याचे सातारकरांकडून कौतुक होत आहे.