

तारळे : तारळे विभागात सुरु असणाऱ्या अदानी कंपनीच्या हायड्रो प्रोजेक्टच्या आडून कंपनीचे अनेक उपदव्याप सुरू आहेत. यानुसार धरणाच्या आतच आणखी एक जवळपास एक टीएमसी पाणीसाठ्याचे धरण बांधण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सध्या तारळे विभागात सुरू आहे.
तसेच यापूर्वी तारळी धरण बांधताना निघालेला राडारोडा तसाच पडलेला असताना आता नवीन बांधण्यात येणाऱ्या धरणाचा व धरणालगत पोखरल्या जात असणाऱ्या डोंगरातून पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याबरोबर येणारा राडारोडा धरणातच येणार आहे. तसेच दरवर्षीपेक्षा सध्या पाणीसाठा कमी दिसत असून कंपनीसाठी पायघड्या घालणाऱ्या शासनाने धरणातील पाणीसाठा व वितरण याचा बारकाईने अभ्यास करून कंपनीचा आणखी काय काय उद्योग सुरू आहे, याची खात्री करण्याची मागणी विभागातून करण्यात येत आहे.
गेल्या काही महिन्यापूर्वी तारळी धरणाच्या लाभक्षेत्रालगत पश्चिमेला अदानी कंपनीचा ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट सुरू होणार असल्याची अवई उठली. कामाची सुरुवात होताच या विभागातील लोकांना याचे संभाव्य धोके दिसू लागले व त्यांनी तारळी पीएसएचपी विरोधी कृती समिती स्थापन करून उठाव सुरू केला.
या हायड्रो प्रोजेक्टसाठी निवडे, तोंडोशी, कळंबे व जळव या गावातील जवळपास 150 हेक्टर क्षेत्र लागण्याचा अंदाज आहे. यासाठी पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय यांनी मंजुरी दिली आहे. या प्रकल्पतून सुमारे 1500 मेगावॅट इतकी विजय निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी सुरुवातीला कळंबे गावच्या वरच्या बाजूला अंदाजे एक टीएमसी पाणीसाठा असणारे धरण बांधण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण आता तारळी धरणाच्या संपादन क्षेत्राच्या क्षेत्राच्या हद्दीत निवडे परिसरात आणखी एक टीएमसी पाणी साठा असणारे धरण होणार असल्याचे सांगितले जात असून संभावित धरणाच्या जागेची अखनीही झाली आहे, अशी चर्चा आहे.
अधिकाऱ्यांना या गोष्टीची पूर्ण कल्पना असून सुद्धा मोठ्या दबावामुळे तेही मूग गिळून गप्प आहेत. तसेच धरणालगत असणारा डोंगर हायड्रो प्रोजेक्टच्या कामासाठी उकरण्यात आला आहे. यातून मोठ्या प्रमाणावर राडारोडा निघत आहे. तसेच तेथे नवीन धरण बांधताना त्यातूनही मोठ्या प्रमाणावर राडारोडा निघणार आहे. त्या राड्या रोड्याची विल्हेवाट न लावता तेथेच सोडून देण्यात येणार असून पावसाळ्यात पाण्याबरोबर तो हजारो ब्रास राडा रोडा धरणात पसरणार आहे. अगोदरच तारळी धरणाच्या पाण्याचे वाटप झाले असताना हायड्रो प्रजेक्टसाठी पाणी वापरले जाणार. म्हणजे लोकांच्या हक्काचे पाणी पळवले जाणार व वरून हजारो ब्रास राडा रोडा धरणात वाहून येणार. याचा फटका भविष्यात तारळे विभागासह या पाण्यावर अवलंबुन असलेल्या कराड, माण, खटाव या परिसरतील हजारो हेक्टर शेतीला बसणार आहे.