NEET Exam: ‘नीट‌’चे परीक्षार्थी मानसिक तणावात

परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये संताप : यंत्रणेबाबत नाराजी
NEET UG 2026 cancelled
NEET UG 2026 cancelledpudhari
Published on
Updated on

सातारा : वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश पारदर्शकतेने पार पाडण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचे तब्बल नऊ दिवसांनी बाहेर आले आहे. त्यामुळे दि. 3 मे रोजी झालेला नीटचा पेपर रद्द करुन पुन्हा त्याच परीक्षा केंद्रावर फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय एनटीएने घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थ्यावर आर्थिक व मानसिक ताण वाढला आहे. मागील दोन वर्षांमध्ये होणाऱ्या पेपर फुटीबाबत विद्यार्थी व पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तसेच नीट परीक्षा यंत्रणेबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

देशातील सर्व वैद्यकीय अभ्यासक्रम शिकवणाऱ्या महाविद्यालयांमधील प्रवेश गुणवत्तेच्या निकषावर व्हावेत, यासाठी नीट परीक्षा सुरु झाली. मात्र गत काही वर्षातील पेपर फुटीमुळे काही संकुचित मनोवृत्तींमुळे पारदर्शक प्रवेशाच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. सध्याच्या नीट परीक्षेतील पेपरफुटीचे प्रकरण सुरुवातीला राजस्थानातील शेखावाटी परिसरापुरते मर्यादित होते. मात्र चौकशीचा विस्तार होत गेल्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य वाढले.

केरळ, राजस्थानंतर महाराष्ट्रापर्यंत हे लोण पोहचल्याने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा सर्वाधिक फटका मागील दोन वर्षांपासून मेहनत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसत आहे. अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत कठीण आर्थिक आणि मानसिक परिस्थितीतून नीटची तयारी केली होती. परीक्षा चांगली गेल्याने चांगल्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली होती.

मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मानसिक ताण येवून अस्वस्थता वाढली आहे. पेपर फोडणाऱ्या अपप्रवृत्तींना ठेचून काढावे तसेच या प्रकरणातील दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news