Satara Politics
Satara Politics: जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलनFile Photo

Satara Politics: जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन

जि. प. निवडणूक एकत्र लढणार : चिन्हांबाबत परिस्थिती पाहून निर्णय
Published on

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक खा. शरद पवार आणि नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अखेर बारामतीमध्ये बैठक घेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 1999 मध्ये स्थापना झालेल्या राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांची चांगलीच होरपळ झाली. पक्षाची झालेली वाताहात थांबविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा मुहूर्त साधून दोन्ही पवार अखेर एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातही मनोमिलनाचा नवा राष्ट्रवादी पॅटर्न राबवण्याच्या दिशेने पावले टाकली गेली असून, मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी एकत्रित येऊन भाजपला रोखण्याचा फॉर्म्युला हाती घेतला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीमधील लढतीचा फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.

भाजपला रोखण्यासाठी ज्या पध्दतीने महापालिका निवडणुकीत फॉर्म्युला राबवण्यात आला होता, त्याच पद्धतीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये राबविला जाईल. बारामतीत पवार साहेबांच्या उपस्थितीत आमची आज बैठक झाली. या बैठकीला खा. सुप्रिया सुळे, ना. अजित पवारही होते. महापालिकेला जसे एकत्रित लढवली. त्याचपध्दतीने जिल्हा परिषद, पंचायत समितीला एकत्रितपणे लढावे. जिथे घड्याळ या चिन्हावर मतभेद असेल तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. समविचारी पक्षांना सोबत घेवून जिल्ह्यात भाजपला रोखू, असा विश्वास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आ. शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीला कशा पध्दतीने सामोरे जायचे? याबाबत ना. मकरंद पाटील यांच्यासोबत लवकरच बैठक घेणार आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याचा फॉर्म्युला हा राज्यात सर्वत्र राबवला जाणार आहे. घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका लढवल्या जातील. मात्र, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा घड्याळ किंवा तुतारी यापैकी एका चिन्हाला विरोध असेल, तिथे दोन्हीपैकी एक चिन्ह दिले जाईल. आम्ही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, त्या झाल्यावर बैठक घेवून उमेदवारी निश्चितीचा निर्णय होईल.

आमची शिंदे गटासोबत चर्चा झालेली नाही. उबाठासोबत प्राथमिक चर्चा झाली. वंचित आघाडी, आरपीआयवालेही सोबत येण्यासाठी इच्छुक आहेत. काँग्रेसने अजूनही संपर्क साधला नाही. भाजपविरोधात सर्व एकत्रित यावे. सातारा, कोरेगावच्या संदर्भात मकरंदआबांशी चर्चा झाली. आमच्या विचाराच्या लोकांशीच आघाडी करणार आहे. मित्रपक्षांशी समन्वय साधून उमेदवारी वाटप केली जाणार आहे, असेही आ. शिंदे म्हणाले.

सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहीला आहे. जिल्ह्यात अजितदादांनी सर्वच प्रमुख विकासकामे मार्गी लावली आहेत. पालककमंत्री असताना तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना त्यांचे सातत्याने जिल्ह्यावर लक्ष राहिले आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून हा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी आहे. पवारसाहेब अजितदादांना मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. महायुतीमधील आमचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपचे नेते स्वबळावर लढण्याचे सूतोवाच करत आहेत. अशा परिस्थितीत स्वकियांची मोट बांधून आम्ही निवडणुकीला सामोरे जावून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला शाबूत ठेवू, असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ना. पाटील म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या 200 पेक्षा जास्त उमेदवारांनी दोन दिवसांत राष्ट्रवादीतर्फे मुलाखती दिल्या आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सकारात्मक भावना जनतेमध्ये आहे. भाजप हा महायुतीमधील प्रमुख पक्ष आहे. मात्र, त्यांच्या नेत्यांनी स्वबळावरच निवडणूक लढण्याचं सुतोवाच केले आहे. अशा परिस्थितीत जी मंडळी आमच्यासोबत येण्याचे मान्य करत आहेत, अशा समविचारी पक्षांशी चर्चा करुन समन्वयाने पुढे कसे जाता येईल, अशी वाटचाल आमची राहिल.

ना. जयकुमार गोरे यांनी फलटण येथे केलेल्या टिकेबाबत छेडले असता ना. मकरंद पाटील म्हणाले, निवडणुका म्हटल्यावर टीका होणार, हे चालत राहणार आहे. ना. गोरे यांनी केलेल्या टीकेची मी माहिती घेतो. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर एकाच चिन्हावर लढणार का? असे विचारले असता निवडणुकीला सामोरे जाण्याबाबतची चर्चा झाल्यानंतर एकत्र येवून कुठल्या चिन्हावर लढायचे? हे ठरवण्यात येईल, असेही ना. मकरंद पाटील यांनी सांगितले.

भाजपला रोखण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत. शरद पवार, अजित पवार यांच्या संमतीने हा निर्णय झाला आहे. जिथे चिन्हांबाबत मतभेद असतील तिथे मैत्रीपूर्ण स्वतंत्र लढू पण भाजप पराभूत करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागत आहे.
- आ. शशिकांत शिंदे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट
आम्ही महायुतीत असलो तरी भाजपच्या नेत्यांनीच स्वबळाची भूमिका घेतल्याने आम्हाला स्वतंत्र लढावे लागत आहे. आम्हीही समविचारी पक्षांना सोबत घेत आहोत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. आणखीही मित्रपक्षांना एकत्र घेऊन भाजपविरोधात आम्ही संयुक्तपणे लढू.
- ना. मकरंद पाटील, मंत्री मदत व पुनर्वसन, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news