

सातारा : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सोमवार दि. १९ रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या मेळाव्यास खा. नितीन पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर उपस्थित राहणार आहेत. पदवीधर मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव यांनी घेतलेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्व आहे.
साताऱ्यातील हॉटेल लेक व्ह्यू येथे दुपारी ३.३० वाजता हा मेळावा होणार आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षाची भूमिका, प्रचाराचे नियोजन आणि संघटनात्मक तयारी याबाबत या मेळाव्यात चर्चा होणार आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी या मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेलचे पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरपरिषद सदस्य तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे यांनी केले आहे.