Satara : नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब

राजकीय रणनीतीला कलाटणी : ओबीसींसह पुन्हा आरक्षण सोडत
Satara News
नगरपालिकांच्या प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब
Published on
Updated on

सातारा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना नव्या प्रभाग रचना व नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) आरक्षणासह सर्वोच्च न्यायालयाची मंजुरी मिळाल्याने सातारा जिल्ह्यातील राजकारणात नव्याने रंग भरू लागले आहेत. प्रभाग रचनेला विरोध करणार्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्यामुळे नव्या आरक्षणाच्या अनुषंगाने निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 9 नगरपालिकांच्या निवडणुकीत राजकीय रणनीतीला नव्या दिशेने कलाटणी मिळणार आहे.

राज्य सरकारने महानगरपालिका आणि नगरपालिकांसाठी नव्याने प्रभाग रचना करून आरक्षण निश्चित केले होते. मात्र या प्रभाग रचनेला विरोध करणार्‍या याचिका न्यायालयात गेल्यामुळे निवडणुका रखडल्या होत्या. आता या अडथळ्यांवर शिक्कामोर्तब झाल्याने सातारा, फलटण, कराड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, मलकापूर या नगरपालिका व मेढा नगरपंचायतीच्या निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागांची आरक्षण सोडत काढण्यात आली होती. कोर्टाने ओबीसी आरक्षण कायम केल्याने खुल्या प्रवर्गात गेलेली ओबीसींची पदे पुन्हा खुल्या प्रवर्गातून काढावी लागणार असल्याने त्याठिकाणी प्रभागांच्या आरक्षणाचे वाटप करावे लागणार आहे. काही नगरपालिकांनी ओबीसीसह प्रभाग आरक्षणे काढली होती. अशा नगरपालिकांमध्ये प्रभागांची नव्याने संपूर्ण आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या नगरपालिकांमधील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित असलेले पूर्वीचे प्रभाग कायम राहणार असले तरी या प्रभागांमध्ये ‘महिला’ व ‘खुला’ या आरक्षणांची अदलाबदली होऊ शकते. तसेच नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग व खुला या प्रवर्गांची संपूर्ण आरक्षणे बदलू शकतात. या उलथापालथीत अनेकांना दणका बसण्याची शक्यता आहे. ओबीसी आरक्षण व प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे स्थानिक स्तरावर इच्छुकांची गणिते बदलली जाणार असून नव्या चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदे गट व उबाठा गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट), काँग्रेस व इतर पक्षांमधील युती आणि समीकरणे नव्याने तयार होण्याची शक्यता आहे. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या या निवडणुका फक्त नगरपालिकांपुरत्याच मर्यादित न राहता आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारीही ठरतील, हे स्पष्ट दिसते. त्यामुळे सातार्‍यात प्रभाग रचना, आरक्षण आणि उमेदवारी यावन राजकीय कुरघोडी आणि आरोप-प्रत्यारोपांचे नवे पर्व सुरु होणार की मनोमीलन होणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सातार्‍याच्या दोन्ही राजांच्या भूमिकेकडे लक्ष...

सातारा पालिकेतील सत्ता आणि राजकीय प्रतिष्ठा ही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यासाठी अत्यंत निर्णायक मानली जाते. या दोन्ही राजांपैकी एका राजाचा गट सत्तेत असतो. नव्याने काढण्यात येणार्‍या आरक्षण सोडतीमुळे या दोन्ही राजांच्या गटांमध्ये नव्याने घडामोडी घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सातार्‍यात राजघराण्याशी संबंधित उमेदवारांना लोकभावनेचा मोठा पाठिंबा असतो. त्यामुळे दोन्ही राजे काय भूमिका घेतात, भाजपातून एकत्र निवडणूक लढवतात की स्वतंत्र ताकद आजमावतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news