Satara municipality: सातारा पालिकेचा 97 कोटींचा प्रकल्प कागदावरच

टीसीएसच्या उद्योगाला बसतेय खिळ : युवकांच्या स्वप्नांचा चुराडा
Satara municipality
Satara municipality
Published on
Updated on

सातारा : साताऱ्यातील शाहूपुरी येथील चोरगेमळा परिसरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि सातारा पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 97 कोटींच्या अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारण्याची घोषणा ढोल वाजवून करण्यात आली. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक तंत्रज्ञान व आधुनिक तंत्रकौशल्य प्रशिक्षणाची संधी साताऱ्यातील युवकांना मिळणार या आशेने अनेकांच्या डोळ्यात स्वप्ने उभी राहिली.

मात्र त्यानंतर पुढे काहीच न झाल्याने केलेल्या घोषणा हवेत विरल्या. साताऱ्याच्या युवकांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाल्या असून नाराजी व्यक्त होत आहे. अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र हा प्रकल्प साताऱ्यातील खऱ्या अर्थाने क्रांतिकारी ठरणार होता. एक एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रकौशल्यांचे प्रशिक्षण मिळणार होते. जगातील आघाडीची आयटी कंपनी असलेल्या टीसीएस आणि सातारा नगरपालिका यांचा हा संयुक्त उपक्रम म्हणजे साताऱ्याच्या शैक्षणिक व तांत्रिक विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरले असते.

97 कोटींच्या या प्रकल्पामुळे सातारा जिल्ह्यातील हजारो युवकांना जागतिक दर्जाचे कौशल्य प्रशिक्षण मिळाले असते आणि रोजगाराच्या नव्या संधी खुल्या झाल्या असत्या. दोन महिन्यांपूर्वी सातारा नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची मोठ्या थाटात पाहणी केली. पदाधिकाऱ्यांचे दौरे झाले, फोटोसेशन झाले. बातम्या झळकल्या आणि साताऱ्यातील युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या पाहणी दौऱ्यानंतर प्रकल्पाच्या अनुषंगाने कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. करारनामा, निधी उपलब्धता, बैठक आदि बाबी जणू थंड बस्त्यात आहेत. घोषणेचा उत्साह ओसरताच प्रकल्प कुठेतरी हरवला, अशी भावना निर्माण झाली आहे.

97 कोटींचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पालिका प्रशासनाने टीसीएससोबत नियमित बैठका घेणे, प्रकल्पाची आखणी निश्चित करणे, जागेच्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे, निधीची तरतूद करणे या बाबी होणे अपेक्षित होते. मात्र या सर्व आघाड्यांवर संपूर्ण उदासिनता दिसत आहे. पाठपुरावा करण्याची जबाबदारी नक्की कुणाची हे अद्याप स्पष्ट नाही. पदाधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत, हे विशेष चिंताजनक आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news