

सातारा : सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून चांगलीच दणाणली. नगरसेवकांनी दै. ‘पुढारी’त प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचा संदर्भ देत अतिक्रमणांविरोधात मोहीम राबवावी, अशी जोरदार मागणी केली. हॉकर्सचा सर्व्हे करून त्यांना पर्यायी जागा द्याव्यात. अपघाताचा धोका वाढल्याने रस्ते, फूटपाथ मोकळे करावेत, यासाठी नगरसेवक आक्रमक झाले.
सातारा पालिकेची सर्वसाधारण सभा छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. नगरसेविका वैशाली राजेभोसले म्हणाल्या, शहरात प्रचंड अतिक्रमणे वाढली आहेत. त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कोलमडली आहे. दै. ‘पुढारी’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे. अनधिकृत व्यवसाय चालतात. प्रशासनाने गंभीर दखल घेऊन अतिक्रमणांविरोधात कारवाया सुरू कराव्यात, अशी मागणी केली. मुक्ता लेवे यांनी अतिक्रमणांविरोधात मोहीम उघडून फूटपाथ खुले करावेत, अशी मागणी केली.
शहर नियोजन सभापती अशोक शेडगे यांनी प्रशासकीय राजवटीत असल्यासारखे अधिकारी वागत असल्याची टीका केली. नगरसेवक फिरोज पठाण यांनी, स्वच्छता कर्मचाऱ्यांना नियमानुसार पगार न देता ठेकेदार त्यांच्याकडून एटीएम व बँक पासबुक काढून घेत असल्याचे निदर्शनास आणले. बांधकाम सभापती बाळू खंदारे यांनीही याकडे लक्ष वेधले. नगरसेवकांच्या सूचनांवर दहा दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी गटनेते अविनाश कदम यांनी केली. असे प्रकार रोखण्यासाठी खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी विनोद जळक यांनी दिले.
संबंधित स्वच्छता ठेकेदाराला काळ्या यादीत घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी तक्रारी दिल्यास इतरांवरही कारवाई करता येईल, अशी सूचना नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी केली. नगरसेवक जयवंत भोसले यांनी विक्रेत्यांना परवानेे द्यावेत, प्रशासनाने तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी केली. यावेळी नगरसेवक सुशांत महाजन, सुनील भंडारी, मयूर कांबळे, विनोद मोरे, तसेच नगरसेविका हेमलता भोसले, शारदा वाघमोडे, वनिता शिंदे यांनीही प्रभागातील समस्यांकडे लक्ष वेधले.