Satara News : सभापतिपदांसाठी नगरसेवकांचे लॉबिंग

खा. उदयनराजे गटाच्या बार्गेनिंग पॉवरची कसोटी : 6 विषय समित्यांकडे लक्ष
Satara Municipal Council
Satara Municipal Council
Published on
Updated on

सातारा : सातारा पालिकेच्या सभापती निवडीची लगबग सुरू होताच साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले आहे. स्थायी समिती व पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीची पदे खा. उदयनराजे गट व ना. शिवेंद्रराजे गटाकडे आल्यानंतर आता उर्वरित सहा विषय समित्यांच्या सभापतिपदांवरून खऱ्या अर्थाने बार्गेनिंग पॉवरची कसोटी लागणार आहे. खा. उदयनराजे गटाचे संख्याबळ जादा असल्यामुळे जादा सभापतिपदे मिळणार की पदांचे समसमान वाटप होणार, याची चर्चा नगरसेवकांमध्ये रंगू लागली आहे. विशेष सभा याच आठवड्यात बोलावली जाणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सार्वजनिक बांधकाम समिती, शिक्षण व क्रीडा आणि सांस्कृतिक कार्य समिती, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, नियोजन व विकास समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच दुर्बल घटक विशेष कल्याणकारी समिती या सहा महत्त्वाच्या समित्यांवर कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या समित्यांचे निर्णय शहराच्या दैनंदिन कारभारावर थेट परिणाम करणारे असल्याने सभापतीपदे ही केवळ प्रतिष्ठेची नसून विकासाची शक्तीकेंद्रे आहेत, हे स्पष्ट होते.

सातारा पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत खासदार उदयनराजे गटाचे जादा नगसेवक निवडून आले होते. त्यामुळे सत्ता समीकरणात त्यांची पकड मजबूत राहील, अशी अपेक्षा होती. मात्र, नुकत्याच झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीत दोन्ही गटांना समसमान जागा देण्यात आल्याने समीकरणात बदल झाला. हम सब भाजप, असे म्हणत ना. शिवेंद्रराजे गटाने स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीत वर्चस्व मिळवले. परिणामी, जादा संख्याबळ असूनही पद वाटपात खा. उदयनराजे गटाला अपेक्षित आघाडी मिळाली नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बार्गेनिंग पॉवर दिसतच नसल्याने आगामी सभापती निवड ही खा. उदयनराजे गटासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे.

नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध सभापती असून उपनगराध्यक्ष हे पाणीपुरवठा व जलनि:स्सारण समितीचे सभापती आहेत. साताऱ्यातील पाणीपुरवठा योजनेची कामे तातडीने पूर्ण व्हावीत यासाठी खा. उदयनराजे भोसले हे आग्रही असल्याने त्यांच्या गटाने पाणीपुरवठा सभापतीपद मिळवले. साताऱ्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असली तरी उर्वरित समित्यांवर प्रभाव राखणेही तितकेच आवश्यक मानले जात आहे. या सभापती निवडीत नवोदित आणि ज्येष्ठ नगरसेवकांतील अंतर्गत चुरस हा आणखी एक महत्त्वाचा पैलू पुढे आला आहे. पहिल्याच टर्ममध्ये सभापती मिळवण्याची महत्त्वाकांक्षा काही नव्या नगरसेवकांनी बाळगली आहे. तर अनुभवी नगरसेवक आपल्या कामकाजाच्या अनुभवाच्या जोरावर दावेदारी करत आहेत. त्यामुळे दोन्ही गटांचा अंतर्गत राजकीय समतोल राखणे हेही नेत्यांसमोरचे आव्हान आहे.

सार्वजनिक बांधकाम समिती, स्वच्छता व वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती, नियोजन व विकास या समित्या आर्थिकदृष्ट्या आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. शहरातील रस्ते, सार्वजनिक स्वच्छता, इमारती, विकास आराखडे, निधीचे प्राधान्यक्रम या सर्वांवर या समित्यांचा प्रभाव असतो. त्यामुळे या समित्यांवर वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जाते. सभापती निवड केवळ पद वाटपापुरती मर्यादित नाही. आगामी निवडणुकांची तयारी, दोन्ही गटांतील एकजूट, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि सातारकर मतदारांपुढील प्रतिमा या सर्व गोष्टी या निर्णयावर अवलंबून राहणार आहेत. जादा जागा जिंकूनही समसमान पदे स्वीकारली जावी लागत असतील तर निवडणुकीत केलेल्या कष्टाचा उपयोग काय? असा सवाल काही नगरसेवकांकडून उपस्थित केला जात आहे. यामुळे गटांतर्गत नाराजी टाळण्यासाठी नेतृत्वाला समतोल साधावा लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news