

सातारा : पालिकेच्या सर्वसाधारण सभेत खा. उदयनराजे गट व ना. शिवेंद्रराजे गटात झालेल्या राड्याचे लोण दोन्ही राजेंपर्यंत पोहोचले आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी तसेच अंतर्गत कलह मिटवण्यासाठी दोन्ही गटांच्या नगरसेवकांसोबत उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सकाळी 10.30 वाजता हॉटेल फर्न येथे बैठक बोलवली आहे. पालिकेतील खातेप्रमुखांनाही उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या असून उपनगराध्यक्ष डी. जी. बनकर व सभापती बाळू खंदारे यांच्या वादावर काय निर्णय होणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
पालिकेची सभा गेल्या आठवड्यात झाली. त्यावेळी उपनगराध्यक्ष बनकर आणि सभापती बाळू खंदारे यांच्यात बार उडाले. यामध्ये खंदारे यांनी बनकर यांचा एकेरी उल्लेख केल्याने गोंधळ माजला. खंदारे यांनी बनकर यांचा पाणउतारा केल्याने याची चर्चा झाली. त्यामुळे राजे गटांत तणाव निर्माण झाला.
या घटनेची माहिती मिळताच उदयनराजे यांनी तातडीने आपल्या नगरसेवकांची बैठक बोलावली. यावेळी उदयनराजेंनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. बनकर यांच्याशी केलेल्या अपमानास्पद वर्तनावर खंदारे यांनी जाहीर माफी मागावी तसेच त्यांना दोन सर्वसाधारण सभांसाठी निलंबित करावे, अशी आग्रही मागणी नगरसेवकांनी उदयनराजे यांच्याकडे केली.
शिवेंद्रराजे यांनीही गटाच्या नगरसेवकांना सुनावले. सभागृहात अर्वाच्च भाषा खपवून घेणार नाही. यापुढे असे प्रकार घडल्यास माझ्याशी गाठ आहे, असा सज्जड दम त्यांनी नगरसेवकांना भरला. दोन दिवसांपूर्वी मुंबई येथे उदयनराजे व शिवेंद्रराजे यांची प्रत्यक्ष भेट झाली. या भेटीत पालिकेतील वादावर चर्चा झाल्याचे समजते.