Satara Murder News
अनैतिक संबंधातून मुंबई पोलिसाकडून खूनfile photo

Satara crime : अनैतिक संबंधातून मुंबई पोलिसाकडून खून

चार मारेकऱ्यांना अटक : सुखेड घटनेचा उलगडा
Published on

सातारा : सुखेड (ता. खंडाळा) येथे एकाचा गळा आवळून खून करत मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याच्या समोर आलेल्या घटनेला अखेर वाचा फुटली आहे. यामध्ये मुख्य संशयित आरोपी नवी मुंबई पोलिस असल्याचे समोर आले आले आहे. मैत्रिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून निर्घृण खून करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या फुटेजमुळे या खुनाच्या घटनेला वाचा फुटली असून, चौघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे.

बंडू बापू भिसे (वय 49, सध्या रा. कळंबोली, जि. रायगड, मूळ रा. दुधेबावी, ता. फलटण), विजय पोपटराव पवार (वय 36, रा. साखरवाडी, ता.फलटण), किरण विकास गायकवाड (वय 27, रा. होळ ता. फलटण सध्या रा. पुणे), श्रीनिवास ज्ञानेश्वर लोणे (वय 25, रा. अंबड जि.जालना सध्या रा.पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यातील बंडू भिसे हा पोलिस असून सोमनाथ खंडू बोबडे (वय 30, सध्या रा. कळंबोली, रायगड) असे खून झालेल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 6 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुखेड, ता. खंडाळा गावच्या हद्दीत चोपडे वस्तीजवळील विहरीमध्ये एक अनोळखी पुरुष असलेला मृतदेह आढळून आला. तो मृतदेह अर्धवट जाळून त्याचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत होता. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली असता घातपात झाला असल्याबाबत प्रथमदर्शनी दिसून आले. त्यानुसार लोणंद पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुध्द अज्ञाताचा खून केल्याप्रकरणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) व लोणंद पोलीस ठाण्याच्या पोलिसांची पथके तयार करण्यात आली. पोलिसांच्या एका पथकाने सीसीटीव्हीची पाहणी केली असता त्यांना एक संशयित कार निष्पन्न झाली. पोलिसांनी 3 दिवस अहोरात्र परिश्रम घेवून कारची माहिती मिळाली. पोलिसांनी तपास वेगाने केला असता खूनाचा थरार समोर आला. कळंबोली येथून संशयित आरोपी बंडू भिसे या मुंबई पोलिसाला ताब्यात घेतले. सातारा पोलिसांनी त्या संशयिताकडे तपास केला असता त्याने खूनाची कबूली दिली. मैत्रीणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन त्याने इतर तीन साथीदारांना सोबत घेतले. सोमनाथ बोबडे यांना संशयितांनी कळंबोली येथून होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने घेतले. सोमनाथ बोबडे याचे दोरीने त्याचे हातपाय बांधून दुसऱ्या दोरीने त्यांचा गळा आवळून खून केला. यानंतर त्याचा मृतदेह त्याच होंडा सिटी कार क्रमांक एमएच 12 डीवाय 8846 यामधून सुखेड ता. खंडाळा येथे आणला. तेथे मृतदेहावर संशयितांनी पेट्रोल टाकून पेटवून मृतदेह विहीरीमध्ये ढकलून देवून खूनाचा पुरावा नष्ट केल्याचा प्रयत्न केला, अशी कबूली संशयित आरोपीने दिली. मुख्य संशयित आरोपीने दिलेल्या या कुबलीनंतर संशयित इतर आरोपींची धरपकड करुन त्यांना अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news