Satara ST Division : एसटीच्या सातारा विभागाची १०.८७ कोटींची दिवाळी

सणासुदीच्या काळात प्रवाशांचा बससेवेला प्रतिसाद
ST Bus
ST BusFile Photo
Published on: 
Updated on: 

सातारा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सलग सुट्ट्या, गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची वाढलेली संख्या आणि पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. दिवाळीच्या कालावधीत सातारा एसटी विभागाने तब्बल १० कोटी ८७ लाख १२ हजार ८५० रुपयांचा महसूल मिळवला आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांचा एसटीकडे वाढलेला कल आणि बससेवेला मिळालेला प्रतिसाद यामुळे विभागाच्या उत्पन्न वाढले.

दिवाळी हा एसटी महामंडळासाठी महत्त्वाचा उत्पन्नाचा हंगाम मानला जातो. शाळा-महाविद्यालयांना सुट्ट्या, नोकरदारांना मिळणाऱ्या रजा, नातेवाईकांच्या भेटीगाठी तसेच पर्यटनासाठी होणारी प्रवासाची लगबग यामुळे या काळात एसटी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. सातारा विभागातही यंदा दिवाळीच्या काळात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढली होती. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, कोकण व अन्य ठिकाणी ११ आगारातून जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.

दिवाळीच्या काळात सातारा विभागातील ११ आगारांनी प्रवासी वाहतुकीचे नियोजन करत विविध मार्गांवर जादा बसफेऱ्या उपलब्ध करून दिल्या. दि. ११ रोजी १ कोटी ७५ लाख ५१ हजार ७६६, दि. १२ रोजी १ कोटी ८४ लाख ६६ हजार ३८२, दि. १३ रोजी १ कोटी ७३ लाख ४१ हजार ३४७, दि. १४ रोजी १ कोटी ७१ लाख १६ हजार २५८, दि. १५ रोजी १ कोटी ८६ लाख ९३ हजार ०७६, दि. १६ रोजी १ कोटी ९५ लाख ४४ हजार २१ रूपयांचा महसूल मिळाल्‍याचे विभागीय वाहतूक अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.

सातारा विभागातील ११ आगारातील सर्व चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, सफाई कामगार, प्रशासकीय व पर्यवेक्षकीय कर्मचारी, आगार व्यवस्थापक व सर्व अधिकाऱ्यांच्या सांघिक योगदानामुळेच सातारा विभागास विक्रमी प्रवाशी उत्पन्न मिळाले आहे.
ज्योती गायकवाड, विभाग नियंत्रक, सातारा विभाग

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.