

मारूल हवेली : मल्हारपेठ (ता.पाटण) येथे घराजवळ उभी केलेली मोटारसायकल चोरी केल्याप्रकरणी मंद्रुळ, ता.पाटण येथील चोरट्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मल्हारपेठ पोलिसांनी हा चोरीचा गुन्हा अवघ्या 24 तासांत उघडकीस आणून मोटारसायकल हस्तगत केली आहे.
याप्रकरणी गणेश शंकर पवार (वय 32, रा.मंद्रुळ, ता. पाटण) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीस गेलेली मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे. याबाबत विक्रम दादासो सूर्यवंशी (रा.मल्हारपेठ) यांनी फिर्याद दिली होती. बुधवार दि.23 रोजी रात्री त्यांची 70 हजार रुपये किमतीची मोटारसायकल घराच्या समोर पार्किंग केली असता अज्ञात इसमाने चोरुन नेली होती.
सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने मल्हारपेठ पोलिसांनी पथक तयार करून तपास केला. घटनास्थळ व मल्हारपेठ ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सीसीटीव्ही फुटेज पाहत असताना एक संशयीत इसम हा मोटारसायकल चोरुन घेऊन जात असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्यानुसार अधिक माहिती घेतली असता मोटारसायकल घेऊन जाणारा इसम हा गणेश शंकर पवार असल्याची माहिती प्राप्त झाली.
त्याप्रमाणे त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने गुन्हा केला असल्याचे कबूल करुन गुन्ह्यातील मोटारसायकल ही नवारस्ता येथे ठेवली असल्याची सांगितले. त्या ठिकाणावरुन गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटार सायकल पोलिसांकडून हस्तगत करण्यात आली आहे. मल्हारपेठचे स.पो.नि.चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जाधव, पिसे, पवार यांनी ही कारवाई केली. अधिक तपास स.पो.फौ. जाधव करीत आहेत.