

सातारा : साताऱ्यातील संभाजीनगर येथे बुधवारी रात्री दुचाकीवर एकट्या युवतीला पाहून अमर सिताराम मतकर (वय 30, रा. संभाजीनगर) याने युवतीची छेड काढत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. युवतीने बचावासाठी आरडाओरडा करत प्रसंगावधान राखत प्रतिकार केला. युवतीच्या आवाजाने जमलेल्या जमावाने युवतीची सुटका करत संशयिताला बेदम चोप दिला व पोलिसांच्या ताब्यात दिले.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री युवती दळण आणण्यासाठी दुचाकीवर घरातून बाहेर पडली. दळण घेवून जात असताना निर्जनस्थळी रस्ता खराब असल्याने ती सावकाश निघाली होती. यावेळी संशयित अमर मतकर तेथे अचानक आला. त्याने युवतीला चालत्या दुचाकीवर धरले व खाली पाडले. यानंतर संशयिताने युवतीला तेथेच फरफटत बाजूला नेण्याचा प्रयत्न केला. युवती या घटनेने घाबरली व तशा परिस्थितीमध्ये तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. संशयित मद्यधुंद अवस्थेत होता. युवतीने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील नागरिक तेथे जमू लागले. युवतीवर जबरदस्ती होत असल्याचे पाहून नागरिकांनी संशयिताला बाजूला ओढले. युवतीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर जमावाने संशयिताची धुलाई केली.
या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताला ताब्यात घेवून उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, रात्री उशीरा युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दिली.