

शिखर शिगणापूर : मोही, ता. माण येथील एका अल्पवयीन मतिमंद मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळशीराम पांडुरंग चव्हाण (वय ६५, रा .मोही) याच्यावर पोक्सो अंतर्गत दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे मोही परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यातील मोही गावच्या हद्दीतील बिगा नावाच्या शेतशिवारात तुळशीराम पांडुरंग चव्हाण (वय, 65) याने तीन महिन्यांपूर्वी मोही गावातील मतिमंद असलेल्या एका अल्पवयीन मुलीस मळ्यातील पत्र्याच्या शेडमध्ये नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तुळशीराम चव्हाण याच्याविरोधात फिर्याद दाखल केली आहे. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोरेगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तोडणी, दहिवडीचे अतिरिक्त उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप पोमन, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे यांनी घटनास्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली.
याप्रकरणी दहिवडी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून संशयित तुळशीराम चव्हाण याला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास पोलिस कोठडी सुनावली आहे.